नवी दिल्ली/बंगळुरू : येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला असला तरी कर्नाटकी नाट्यावर पडदा पडलेला नाही. रातोरात सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा शपथविधी न होऊ देण्यात काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांना यश आले नाही. परंतु झालेल्या शपथविधीची वैधता कोर्टाच्या निर्णयाने ठरणार असल्याने, शुक्रवारच्या सुनावणीत काय होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यपाल वजुभाई वाला यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता राजभवनात येडियुरप्पा यांना पदाची शपथ दिली. पण हे सत्तानाट्य अंगाशी येण्याची शक्यता असल्याने या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित नव्हते. शपथ घेताना स्वत: येडियुरप्पाही फारसे आनंदी वाटत नव्हते. शपथविधीच्या विरोधात काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांनी कर्नाटक विधानसभेबाहेर धरणे सुरू केले. दोन्ही पक्षांचे सर्व तसेच अन्य व अपक्ष असे तीन आमदारही त्याला उपस्थित होते, असे सांगण्यात आले. विधानसभेबाहेर राज्यपाल व येडियुरप्पांच्या विरोधात घोषणा सुरू असताना, बंगळुरूसह संपूर्ण राज्यभर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बहुमत सिद्ध केल्यावर आपण मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असे येडियुरप्पा यांनी नंतर जाहीर केले. तसेच शेतकऱ्यांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे काही विरोधी आमदार आपणास येऊ न मिळतील, अशी त्यांना अपेक्षा आहे.>३२ लिंगायत आमदारांवर लक्ष?काँग्रेस व जनता दलातील लिंगायत आमदारांकडे भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. वोक्कालिंग समाजाच्या कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांतील लिंगायत आमदारांना मान्य नसल्याने ते फुटतील, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे २१, तर जनता दलाचे १0 आमदार लिंगायत आहेत. काँग्रेसचे २ लिंगायत आमदार गायब असून, ते भाजपाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.>सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणीबहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी येडियुरप्पांना १५ दिवसांची मुदत दिली असली तरी काँग्रेसच्या याचिकेची सुनावणी शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्या वेळी येडियुरप्पा यांनी राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी कोर्टासमोर ठेवली जाईल. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनीही शपथविधीला स्वतंत्र आव्हान दिले, तेही उद्या या खंडपीठापुढे आपले म्हणणे मांडतील.>मोदीस्टाईल सुरुवात : शपथविधी झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी मंदिरात देवदर्शन घेतले आणि नंतर विधानसभेच्या पायºयांवर ते नतमस्तक झाले. नरेंद्र मोदी यांनीही पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा संसदेत जाण्याआधी अशीच कृती केली होती.
सुप्रीम कोर्टात होणार मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या भवितव्याचा फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 6:29 AM