सूरत- जम्मू-काश्मीरच्या कठुआमधील आठ वर्षाची चिमुरडी आसिफावर झालेल्या बलात्कार व हत्येच्या घटनने संपूर्ण देश हळहळला. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. कठुआतील प्रकरण ताजं असतानाचा सूरतमध्येही एका 9 ते 11 दरम्यान वय असणाऱ्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाजद उमटत असून लोक राग व्यक्त करण्यासाठी व न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. सर्वसामान्य लोकांपासून ते पोलीस प्रशासनापर्यंत सर्वांनीच बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यासाठी बक्षीसाची घोषणा केली आहे.
मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. दुसरीकडे, पीडित मुलगी नेमकी कोण आहे? त्याबद्दलची ओळखही पटलेली नाही. मुलीच्या बाबतीत माहिती देणाऱ्याला पोलिसांनी 20 हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यासंदर्भातील पोस्टरही सूरतमध्ये लावण्यात आले आहेत.
९ ते ११ दरम्यान वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी रविवारी सांगितलं.शहरातील भेस्तन परिसरात एका क्रिकेट ग्राउंडजवळ तिचा मृतदेह सापडला होता. तिच्या देहावर तब्बल ८६ जखमा होत्या.तिच्या गुप्तांगावरही अनेक जखमा आढळून आल्या. तिचा गळा घोटून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं.या बलात्काऱ्यांनी क्रौयार्ची परिसीमा गाठत मुलीला प्रचंड यातना दिल्याचं तिच्या मृतदेहावरुन लक्षात येत आहे. पीडित मुलीवर तब्बल आठ दिवस अत्याचार करुन, नराधमानी तिची निर्घृण हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पण अजूनही या मुलीची ओळख मात्र पटलेली नाही.
या घटनेचा निषेध करण्यासाठी व पीडितेला न्याय देण्यासाठी शहरात लोक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी कॅण्डल मार्च व रॅली काढण्यात आल्या. यामध्ये डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, बँकर्स व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आरोपींची नाव सांगणाऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांनीही बक्षीस जाहीर केलं आहे. तेथिल स्थानिक डेव्हलपर तुषार घेलानी यांनी आरोपीची ओळख सांगणाऱ्याला 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.