सूरतच्या ‘त्या’ मुलीची आईसोबत झाली होती ३५ हजारांत विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:15 AM2018-04-22T00:15:55+5:302018-04-22T00:15:55+5:30
नवी माहिती झाली उघड; राजस्थानातून एकाला अटक
सूरत : येथे ११ वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार करुन खून केल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली असून या माय-लेकींची ३५ हजारात विक्री झाली होती असे आता स्पष्ट होत आहे. राज्य पोलिसांनी हा दावा केला असून या प्रकरणात राजस्थानहून एकास अटक करण्यात आली आहे.
पोलिस तपासातून समोर आले की, मुलीची आई विधवा आहे. ती राजस्थानच्या गंगापूरची रहिवासी आहे. दोघींना खरेदी करुन सूरतला आणण्यात आले होते. मजूर म्हणून त्यांच्याकडून काम करुन घेतले जात होते. यातील आरोपीचे नाव हरसाई गुर्जर (३५)असे असून तो राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. क्राइम ब्रँचने आरोपीच्या दोन भावांना हरिसिंह आणि अंबरिश गुर्जर याला ताब्यात घेतले आहे.
हरसाई आणि त्याचा भाऊ हरिसिंह सूरतमध्ये मार्बल कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम करतात. हरसाईने पीडित महिला आणि तिची मुलगी यांना खरेदी करुन येथे आणले होेते. हरसाई हा दोघींकडून मजूरांचे काम करुन घेऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता. ही महिला जेव्हा मुलीवरील बलात्काराचा विरोध करत होती तेव्हा तो तिला जिवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे ही महिला येथून गायब झाली. तेव्हा आरोपीने मुलीचा गळा दाबून खून केला
आणि जवळच झुडपात तिला टाकून दिले.