सुरेश अंगडी यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 08:55 AM2020-09-24T08:55:40+5:302020-09-24T08:59:26+5:30
गुरुवारी सायंकाळी 4 वाजता दिल्ली लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
बेळगाव : दिल्लीतील एम्स इस्पितळात कोरोनामुळे निधन झालेले बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यावर गुरुवारी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दिल्लीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जातील, अशी माहिती मिळाली आहे.
बुधवारी रात्री त्यांचे निधन होताच केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी यांच्यासह कर्नाटकातील मंत्री लोकप्रतिनिधीनी त्यांचे पार्थिव दिल्लीहून बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे व्याही माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे रात्रीच बंगळुरूहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. त्यांनीही पार्थिव बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोविड नियमावली नुसार त्यांचे पार्थिव दिल्ली बाहेर नेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली नव्हती. यासाठी अंतिम संस्कार दिल्लीतच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुरुवारी सायंकाळी 4 वाजता दिल्ली लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. कर्नाटक भाजपाचे अनेक नेते, जवळचे कुटुंबीय पहाटे पाच बंगळुरूहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अंगडी यांची पत्नी मंगला अंगडी, मुलगी श्रद्धा आणि मोठे जावई दिल्लीतच आहेत तर सदाशिव नगर येथे मोठी मुलगी डॉ. स्फूर्ती होत्या. त्या व त्यांचे भाऊ देखील विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्ली द्वारका सेक्टर 4 मधील लिंगायत स्मशानभूमीत अंगडी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशीही माहिती मिळाली आहे.
सुरेश अंगडी बेळगाव मतदारसंघातून लोकसभेवर सतत चार वेळा निवडून गेले होते. बुधवारी रात्री त्यांना कोरोनाने हरवले. त्यांना श्रद्धांजली म्हणून बेळगावच्या जनतेने एक दिवस बेळगाव बंद ठेवावे, अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
आणखी बातम्या..
- बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज
- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो
- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी