डेहराडून : आवश्यकता भासल्यास भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात पुन्हा एकदा लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) करेल, असे भूदलाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी म्हटले आहे. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या (आयएमए) दीक्षांत संचलनप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. या संचलनानंतर ४२७ प्रशिक्षणार्थी अधिकारी झाले. त्यातील ८० विद्यार्थी भारताच्या मित्रदेशांतून आयएमएमध्ये लष्करी शिक्षण घेण्यासाठी आले होते.अंबू म्हणाले की, सीमेपलीकडे असलेले दहशतवादी तळ लक्ष्यभेदी हल्ल्याद्वारे उद्ध्वस्त करून भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी क्षेत्रामध्ये लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतीय लष्कराने २९ सप्टेंबर २०१६ रोजी लक्ष्यभेदी हल्ला केला. त्यावेळी भूदलाच्या उत्तर कमांडचे प्रमुख असलेले व आता निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी शुक्रवारी चंदिगढ येथे एका कार्यक्रमात म्हटले होते की, हल्ला केल्यानंतर त्याची जी प्रचंड प्रसिद्धी करण्यात आली ती अनावश्यक होती. लक्ष्यभेदी हल्ला अत्यंत गुप्तता राखून करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतरही त्याचा फार गाजावाजा केला नसता तर बरे झाले असते.युद्धभूमीवर महिला?देवराज अंबू म्हणाले की, चीन व पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा भागातील परिस्थिती देशातील इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे लष्करातील महिला जवानांना थेट युद्धभूमीवर लढण्यास पाठविण्याबाबतचे सारे पैलू तपासून पाहिले जात आहेत. त्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी तयारी सुरू असल्याचे सूतोवाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नोव्हेंबर महिन्यातच केले होते.
'आवश्यकता भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 6:19 AM