गांधी कुटुंबीयांचं ठरलंय, सुशीलकुमार शिंदेच होणार काँग्रेसचे अध्यक्ष ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 05:24 PM2019-06-30T17:24:57+5:302019-06-30T17:52:43+5:30
संडे गार्जियनच्या वृत्तानुसार, गांधी कुटुंबीयांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही आणि नवा अध्यक्ष पक्षानेच निवडावा, असे पुन्हा स्पष्ट केल्याने काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाचा शोध सुरू झाला आहे. कोणत्याही वाद वा मतभेदाविना आणि सर्वसंमतीने नवा पक्षाध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न आता एका नावार येऊन थांबले आहेत. ज्येष्ठ काँग्रेसनेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
संडे गार्डियनच्या वृत्तानुसार, गांधी कुटुंबीयांकडून काँग्रेस अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या नावाला जाहीर करण्यासाठी अद्याप काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत जवळपास 140 नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे राजीनामा नाट्य संपल्यानंतरच ही घोषणा होईल, अशी माहिती आहे.
नवा पक्षाध्यक्ष ठरवण्यात राहुल गांधी स्वत: सहभागी होणार नसले तरी सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. आपण नव्या अध्यक्षाबाबत कोणाशी चर्चाही करणार नाही, असे राहुल गांधी यांनी नेत्यांना सांगितले आहे. नवा पक्षाध्यक्ष कोणीही असला तरी त्याला आपण सहकार्य करू आणि त्याच्यासह काम करीत राहू, असेही राहुल गांधी यांनी नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावांची होती. याशिवाय सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मीरा कुमार, पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावे पुढे आली होती. मात्र, सुशीलकुमार शिंदे हे सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्याकडेच पक्षश्रेष्ठींनी मोठी जबाबदारी दिल्याचं समजतंय.
सुशीलकुमार शिंदे आज राहुल गांधींची भेट घेणार
सुशीलकुमार शिदे राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यानच शिंदे यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. गांधी कुटुंबाचे सल्लागार, ज्येष्ठ नेते आणि इतरही प्रमुख नेत्यांकडून शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वीही काँग्रेसने दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर, त्यांना केंद्रात मंत्रीपद दिले होते. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे जरी लोकसभेला पराभूत झाले असले तरी, त्यांच्याकडे देशाचं नेतृत्व देण्यास गांधी कुटुंब उत्सुक असल्याचं समजतंय.
त्यामुळे शिंदेना अध्यक्षपदाची माळ
सुशीलकुमार शिंदे यांनी कधीही कुठल्याही पदासाठी महत्वाकांक्षा दाखवली नाही. यापूर्वीही विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा असताना, विलासराव यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते. तर, सुशीलकुमार यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले होते. त्यावेळीही ते कुठल्या पदासाठी विशेष आग्रही राहिले नाहीत. तर, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभव निश्चित असतानाही, केवळ पक्षाचा आदेश मानून त्यांनी निवडणूक लढवली. तसेच, आगामी 3 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेसला पुनरुज्जीवीत करण्यासाठी सुशीलकुमार शिंदेंकडे ही मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना जोडणारा पूल म्हणून सुशीलकुमार शिंदेंकडे पाहिले जाते, तेही प्रमुख कारण आहे.