गाझियाबाद - एका विवाहित जोडप्याचा त्यांच्या राहात्या घराच्या बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. गाझियाबादच्या ग्यान खांद येथे ही घटना घडली. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी पती-पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नीरज सिंघानिया (38) आणि रुची सिंघानिया अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. नीरज मॅट्रीक्स सेल्युलर सर्व्हीसेस लिमिटेडमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर होते. शुक्रवारी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर नीरज आणि रुची दोघेही 5.30च्या सुमारास कुटुंबियांसोबत घरी परतले.
नीरजच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंबाने रात्री डिनरला जाण्याचा बेत आखला होता. त्यासाठी दोघे तयार होण्यासाठी म्हणून त्यांच्या बेडरुममध्ये गेले. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास नीरजचे वडिल प्रेम प्रकाश सिंघानिया त्यांना बोलावण्यासाठी म्हणून त्यांच्या रुममध्ये गेले. त्यांनी दोघांची नावे पुकारुन दरवाजा ठोठावला पण आतून काही प्रतिसाद आला नाही. रात्री 9.30च्या सुमारास ते पुन्हा डिनरला जायचे असल्याने बोलावण्यासाठी म्हणून गेले. त्यांनी दरवाजा ठोठावून दोघांच्या नावाने हाका मारल्या पण आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी अघटित घडल्याची संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. त्यांनी नीरजच्या लहान भावाला वरुणला बोलावले.
वरुणने दरवाजा तोडून आता प्रवेश केला. त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा नीरज आणि रुची दोघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. दोघांना लगेच नजीकच्या रुग्णालयात हलवले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही आत्महत्या आहे कि, हत्या या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचलेले नाहीत. परिस्थितीजन्य पुराव्यांवरुनही काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला का ? या प्रश्नावर नीरजचे वडिल म्हणाले कि, बाथरुममधील गॅस गिझर बंद होता आणि पाण्याच्या बादल्या रिकाम्या होत्या. नीरज आणि रुचीच्या शरीरावर आवळल्याच्या किंवा कुठल्याही जखमा नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल.