आग्रा - जगभरातल्या करोडो पर्यटकांची पसंती असलेला ताजमहाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय इतिहासातला कलंक आहे, असे उद्गार काढले. तर भाजपाचे नेते विनय कटियार यांनी ताजमहाल हे मुळचे शिवमंदीर असून त्याचे नाव तेजोमहाल होते असा दावा केला. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र या विषयावर मौन बाळगले आहे. तर, काही पुरातत्व तज्ज्ञांनी ताजमहालच्या खाली हजारो खोल्या असल्याचा दावा केला आहे. ताजमहालच्या बाबतीत अनेक बाबी जाणुनबुजून गुप्त ठेवण्यात आल्याचा दावा करणारा व ताजमहाल जेवढा वर आहे, तितकंच बांधकाम त्याच्याखाली आहे असे सांगणारा एक व्हिडीयो सध्याप्रचंड व्हायरल झाला आहे.
प्रत्येक देशातील ऐतिहासिक वास्तूमागे कितीतरी इतिहास लपलेला असतो. हा इतिहास रोमांचकारी असतो तर कधीकधी थक्क करणारा असतो. पण एखाद्या ऐतिहासिक वास्तूमागील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असतेच असं नाही. कधी-कधी राजकीय नेते या गोष्टी सामान्य माणसांपासून मुद्दामहून लपवतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचपैकी एक वास्तू म्हणजे भारताची शान असलेला ताजमहल. काही जणांचा दावा आहे की ताजमहलबाबतही अशा काही गोष्टी आहेत ज्याविषयी मुद्दाम गुप्तता पाळली गेली आहे.
ताजमहल बांधणीचं काम १६३१ मध्ये सुरू झालं आणि सन १६५३ मध्ये ताजमहल बांधून पूर्ण झाला होतं. असं सांगण्यात येतंय की, ताजमहलच्या खाली आजही हजारो खोल्या आहेत. याचाच अर्थ असा की, ताजमहल जेवढा उंच आहे, तेवढाच तो खाली खोलही आहे.पूर्वीच्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तूमध्ये एखादा भूयारी मार्ग बनवलेला असे. हा भूयारी मार्ग एका वेगळ्या ठिकाणी बाहेर पडतो. त्याचप्रमाणे ताजमहलमध्येही एक भूयारी मार्ग असून तो कुठून तरी नक्की बाहेर पडत असेल असाही दावा करण्यात येत आहे. पण शहाजहानच्या काळापासून हा रस्ता बंद आहे. त्याचप्रमाणे ताजमहलच्या खाली असलेल्या हजारो खोल्यांना विटांच्या भिंती बांधून लपवल्याचा आरोप काही जणांनी केला आहे.
काहींच्या मते या खोल्यांमध्ये मुमताजची समाधी बांधण्यात आली आहे. तर काहींच्या मते ताजमहल बांधण्याआधी तिथे शंकराचं मंदिर होतं. त्या मंदिर परिसराला तेजोमहल असं म्हटलं जाई. त्यानंतर त्या मंदिरावरच हा ताजमहल बांधण्यात आला आहे, असा दावाही केला जातो. पु. ना. ओक यांनी तर ताजमहाल नव्हे तेजोमहल या नावाची एक पुस्तिकाच काही दशकांपूर्वी प्रसिद्ध केली होती, आणि शेकडो गोष्टी मांडत हे शंकराचं मंदीर कसं आहे, हे सांगण्याचा खटाटोप केला होता. जर बंद केलेल्या खोल्या उघडल्या, आणि ताजमहलच्या खाली असलेल्या खोल्यांचा तपास केला तर किंमती दस्तावेज आणि खजिनाही सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अर्थात, सरकारी अधिकृत पातळीवर ताजमहल हा शहाजहान बादशाहाने आपल्या पत्नीच्या पश्चात तिची आठवण म्हणून बांधलेली वास्तू अशी मान्यता आहे. अधिकृतरीत्या अन्य दाव्यांना अद्यापतरी कुठलाही आधार किंवा संशोधनाचं पाढबळ मिळालेलं नाही.