राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येची फेरचौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 04:44 AM2017-10-07T04:44:43+5:302017-10-07T04:45:02+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी करावी, या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत..
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येची पुन्हा चौकशी करावी, या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत ज्येष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली.
न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या पीठाने हे आदेश दिले. १५ मिनिटे चाललेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले की, ज्या प्रकरणात खूप वर्षांपूर्वी निर्णय झाला आहे त्यात आता काही केले जाऊ शकत नाही.
याचिकेवर ३० आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. मुंबईच्या ‘अभिनव भारत’चे ट्रस्टी डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका केली आहे. यात असा दावा केला आहे की, गांधी हत्येशी संबंधित याआधी झालेला तपास म्हणजे इतिहासावर पडदा टाकल्यासारखे आहे. नथुराम गोडसे याने ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे सादर करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास पुन्हा का करावा, असा सवाल न्यायालयाने केला. तेव्हा फडणीस म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्याच्या प्रकारात अन्य व्यक्तीही सहभागी असू शकतात.