मदुराई- तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या कॉपर प्लांटच्या विरोधात हजारो स्थानिकांनी निदर्शनं केली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाला असून, केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागवला आहे.गोळीबाराचं वृत्त पोलिसांनी फेटाळलं असून, मात्र मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पोलीस गोळीबारात निदर्शक मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधीशांमार्फत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, तर जखमींना 3 लाखांची मदत जाहीर केली. या प्रकारामुळे द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे हवा व पाण्याचे अतोनात प्रदूषण होते, असा स्थानिकांचा व स्वयंसेवी संस्थांचा आरोप आहे.प्रचंड बंदोबस्त मुख्यमंत्री एडापडी पलानीस्वामी यांनी तेथील जनतेला शांततेचे आवाहन केले तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी पोलिसी अत्याचारांचा निषेध केला. तुतिकोरिनमध्ये आता 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.