Petrol Diesel : किंमती वाढवताना आम्हाला विचारलेलं का?, ‘या’ राज्याच्या अर्थमंत्र्यांचं सीतारामन यांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 11:14 AM2022-05-22T11:14:53+5:302022-05-22T11:15:36+5:30
Centre Reduces Excise Duty on Fuel: देशात २२ मे पासून पेट्रोल साडेनऊ रुपये आणि डिझेल ७ रुपये स्वस्त झालं आहे.
इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. दरम्यान, यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लोबोल केला. तसंच यानंतर तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. थियाग राजन यांनी शनिवारी रात्री उशिरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्वीटला रिट्वीट केलं. यामध्ये सीतारामन यांनी ज्या राज्यांनी आतापर्यंत वॅटमध्ये कपात केली नाही, त्या राज्यांना त्यांनी आवाहन केलं होतं. केंद्रानं तेव्हा कोणालाही विचारलं नाही, जेव्हा २०१४ पासून पेट्रोल २३ रुपये प्रति लिटर, डिझेल २९ रुपये प्रति लिटर केंद्रीय कर वाढवला, असं राजन म्हणाले. केंद्रानं आपल्या वाढीच्या ५० टक्के कपात केली, तर राज्यांनाही आवाहन केलं जात आहे, असंही त्यांनी म्हटलं.
🤔The Union Government didn't INFORM, let alone ASK for ANY state's view when they INCREASED Union taxes on Petrol ~23 Rs/ltr (+250%) & Diesel ~29 Rs/ltr (+900%) from 2014
— Dr P Thiaga Rajan (PTR) (@ptrmadurai) May 21, 2022
Now, after rolling back ~50% of their INCREASES, they're EXHORTING States to cut
Is this Federalism ? https://t.co/moYsfqHtdL
उद्धव ठाकरेंचाही निशाणा
केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली
पेट्रोल डिझेलची कपात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात जाहीर केली. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक व स्टीलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे. तर काही स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे. सिमेंटच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी मालवाहतुकीत सुधारणा करण्यात येतील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
गेल्या काही महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११० डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीही देशभरात १ हजार रुपये प्रति सिलिंडरवर गेल्या आहेत. याशिवाय सरकारने सीएनजीच्या किमतीमध्येही वर्षभरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्य जनतेचं बजेट पूर्णपणे कोलमडलं होतं.