इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे हाेरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने माेठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. दरम्यान, यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लोबोल केला. तसंच यानंतर तामिळनाडूच्या अर्थमंत्र्यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. थियाग राजन यांनी शनिवारी रात्री उशिरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ट्वीटला रिट्वीट केलं. यामध्ये सीतारामन यांनी ज्या राज्यांनी आतापर्यंत वॅटमध्ये कपात केली नाही, त्या राज्यांना त्यांनी आवाहन केलं होतं. केंद्रानं तेव्हा कोणालाही विचारलं नाही, जेव्हा २०१४ पासून पेट्रोल २३ रुपये प्रति लिटर, डिझेल २९ रुपये प्रति लिटर केंद्रीय कर वाढवला, असं राजन म्हणाले. केंद्रानं आपल्या वाढीच्या ५० टक्के कपात केली, तर राज्यांनाही आवाहन केलं जात आहे, असंही त्यांनी म्हटलं.
पेट्रोल डिझेलची कपात
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात जाहीर केली. महागाई कमी करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक व स्टीलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कात कपात करण्यात येणार आहे. तर काही स्टील उत्पादनावर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे. सिमेंटच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी मालवाहतुकीत सुधारणा करण्यात येतील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
गेल्या काही महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ११० डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या किमतीही देशभरात १ हजार रुपये प्रति सिलिंडरवर गेल्या आहेत. याशिवाय सरकारने सीएनजीच्या किमतीमध्येही वर्षभरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली असून सर्वसामान्य जनतेचं बजेट पूर्णपणे कोलमडलं होतं.