भाजपानं बहिष्कार टाकण्याचं आवाहन केल्यानंतर दुकानाच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचा दावा तमिळनाडूच्या कोईम्बतूरमधील एका दुकानदारानं केला. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपानं व्ही. करप्पन यांच्या 'करप्पन सिल्क' दुकानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर दुकानात येणाऱ्या द्राविडी लोकांचं प्रमाण वाढू लागलं. त्यामुळे दुकानाच्या नफ्यात मोठी वाढ झाल्याचा दावा करप्पन यांनी केला. कोईम्बतूरमध्ये व्ही. करप्पन यांचं 'करप्पन सिल्क' नावाचं दुकान आहे. ७० वर्षांचे करप्पन निरीश्वरवादी विचारसरणीचे आहेत. त्यांनी हातमागाशी संबंधित दोन पुस्तकं लिहिली आहेत. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना करप्पन यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप भाजपानं केला आहे. द्रविड इयक्का तमिझार पेरावाई संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. भाजपानं आक्रमक पवित्रा घेताच व्ही. करप्पन यांनी स्पष्टीकरण दिलं. मला कोणाच्याही देवदेवतांचा किंवा धर्माचा अपमान करायचा नव्हता, असं करप्पन यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यानं भाजपाचे राष्ट्रीय सचिव एच. राजा यांचं समाधान झालं नाही. हिंदूंनी करप्पन यांच्या दुकानावर बहिष्कार घालावा, असं आवाहन त्यांनी केलं. यामुळे करप्पन सिल्कच्या विक्रीवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. करप्पन सिल्कवरील बहिष्काराचा मुद्दा सोशल मीडियावर पेटला. यानंतर द्रविडी संघटना एकवटल्या. या संघटनेच्या सदस्यांनी आणि समर्थकांनी करप्पन सिल्कला भेटी देण्यास सुरुवात केली. यामुळे करप्पन सिल्कच्या विक्रीत मोठी वाढ झाली. आधी दुकानातून दिवसाकाठी काही हजारांचा व्यवसाय व्हायचा. मात्र आता तो आकडा लाखांच्या घरात गेल्याचं करप्पन यांनी सांगितलं. मी माझ्या विधानाबद्दल आधीच माफी मागितली आहे. आम्ही कोणत्याही जातीच्या, धर्माच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही. मी माझ्या पुस्तकांमधून भाजपाच्या कामाचं कौतुकदेखील केलं आहे, असं करप्पन म्हणाले. राजा यांनी माझ्या दुकानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. त्यासाठी त्यांनी ट्विट केलं. मी त्यांचे आभार मानतो, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.
भाजपानं दुकानावर टाकला बहिष्कार अन् घडला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 10:46 PM