त्रिची (तामिळनाडू) : तामिळनाडूमध्ये एक गरोदर महिला सरकारी इस्पितळामध्ये आली होती. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला दिलेला सल्ला ऐकून तिच्यासह पतीने इस्पितळातूनच पलायन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वेतियानगुडी गावामध्ये घडली.
गरोदर महिलेचे नाव आरायी (वय 52) असे आहे. ती 9 मुलांची आई आहे. 13 वर्षांनी ती अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल झाली होती. यावेळी डॉक्टरांनी तपासणीत ती गरोदर असल्याचे सांगितले. गरोदर असल्याचे तिला माहितही नव्हते. तसेच ही तिची 10 वी वेळ असल्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचाही सल्ला दिला. हा सल्ला ऐकून या महिलेने तिच्या पतीसह इस्पितळातून पलायन केले.
या महिलेचा परिवार सध्या 60 फुटांच्या खोलीमध्ये आपल्या 5 मुलांसमवेत राहतो. हा परिवार कधीही एका ठिकाणी थांबत नाही. ते सारखी जागा बदलत असतात. त्यांच्या चार मुलांचे लग्नही झाले आहे. ते आपापल्या परिवारासह राहतात. आरायीला ती कधी गरोदर राहिली हे समजलेच नाही. रजोनिवृत्तीमुळे ती गरोदर राहणार नसल्याच्या भ्रमात ती राहील्याचे डॉक्टरांनी सांगितले.
स्थानिकांच्या मते आरायीच्या सर्व प्रसुत्या या घरीच झालेल्या आहेत. इस्पितळाचे डॉक्टर तिच्यावर शस्त्रक्रिया करतील अशी भीती तिला वाटत आहे. या कारणामुळे ती यापुर्वीही इस्पितळातून पळून गेली होती.