चेन्नई : गेल्या ५ नोव्हेंबरला श्रीहरीकोटा अंतराळ तळावरून प्रक्षेपित केलेल्या ‘मार्स आॅर्बिटर मिशन’चे अर्थात मंगळ यानाच्या गेले ३०० दिवस सुप्तावस्थेत असलेल्या मुख्य इंजिनाचे पुनर्प्रज्वलन करण्याची अत्यंत महत्त्वाची चाचणी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी सोमवारी फत्ते केली.येत्या बुधवारी मंगळ यान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणार आहे. त्यासाठी यानाला रेटा देणारे ४४० न्यूटन क्षमतेचे मुख्य इंजिन - ‘लिक्विड अॅपोजी मोटार’ - पूर्ण क्षमतेने सुरू होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुप्तावस्थेत असलेले हे इंजिन सोमवारी दुपारी २.३० वाजता ३.९६८ सेकंदांसाठी पुन्हा प्रज्वलित करून ते ठीकपणे सुरू होते की नाही याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले.सोमवारी करायच्या या चाचणीचे टेलीसंदेश बंगळुरू येथील मुख्य नियंत्रण केंद्रातून यानाला गेल्या आठवड्यातच धाडण्यात आले होते. यानाने त्याचे तंतोतंत पालन केले व मुख्य इंजिन सुमारे चार सेकंदांसाठी प्रज्वलित होऊन आपणहून पुन्हा बंद झाले. हे यान सध्या पृथ्वीपासून २२ कोटी किमी अंतरावर असल्याने दिलेल्या संकेतानुसार सुप्तावस्थेत असलेले इंजिन खरोखरीच पुन्हा सुरू झाले याची माहिती वैज्ञानिकांपर्यंत पोहोचण्यास १२ मिनिटांहून थोडा अधिक वेळ लागला. इंजिनाच्या प्रज्वलनाने यान त्याचा नियत मार्ग सोडून सुमारे १०० किमी बाहेर गेले, पण ते अल्पावधीत पुन्हा ठरलेल्या मार्गावर आले. आता बुधवारी हे इंजिन २४ मिनिटांसाठी चालविले जाईल व त्याच्या रेट्याने यान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्र्षण कक्षेत प्रवेश करेल. ते कामही फत्ते झाले की मंगळावर यान पाठविणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत मानाचे स्थान पटकावेल. बुधवारच्या या ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथील मुख्य नियंत्रण केंद्रात जातीने हजर राहून वैज्ञानिकांचा हुरूप वाढविणार आहेत. (वृत्तसंस्था)
मंगळ यानाची रंगीत तालीम फत्ते !
By admin | Published: September 23, 2014 5:31 AM