श्रीनगर : श्रीनगरच्या करन भागात सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलीस दल) शिबिरावर सोमवारी सकाळी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी कोसळत्या बर्फात उधळून लावला. यानंतर अतिरेकी लपून बसले असता निमलष्करी दलाच्या जवानाने त्यांना पाहिले. तेव्हा उडालेल्या चकमकीत निमलष्करी दलाचा एक जवान शहीद झाला आहे. अतिरेक्यांना शोधण्यासाठी आॅपरेशन सुरू आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेचा काश्मीरचा प्रमुख मेहमूद शाह याने हा दावा केला आहे.हा जवान सीआरपीएफच्या ४९ बटालियनचा भाग होता. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या चकमकीत गोळीबार सुरू असताना. घटनास्थळी स्थानिक तरुण जवानांवर दगडफेक करत होते. जवान आणि या तरुणांमध्येही संघर्ष झाल्याचे वृत्त आहे.मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या अतिरेक्यांनी राजा हरिसिंग हॉस्पिटलजवळच्या सीआरपीएफ शिबिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ६ फेब्रुवारी रोजी अतिरेक्यांनी याच हॉस्पिटलमधून लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी नवीद जट उर्फ अबू हंजला याला पोलिसांच्या तावडीतून सोडविले होते. (वृत्तसंस्था)सुंजवामध्ये तपास मोहीम सुरूचजम्मू : सुंजवाच्या लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्यानंतर तपास मोहीम अद्याप सुरू असल्याचे सैन्याच्या वतीने सांगण्यात आले. या हल्ल्यात ४ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर पाच जवान शहीद झाले होते. या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली होती. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये सुभेदार मदनलाल चौधरी, सुभेदार मोहम्मद अशरफ मीर, हवालदार हबीबउल्लाह कुरैशी, नायक मंजूर अहमद आणि लांस नायक मोहम्मद इकबाल यांचा समावेश आहे.पाकिस्तानशी चर्चा कराहिंसाचार थांबविण्यासाठी पाकशी चर्चा करा अशी मागणी जम्मू -काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. विधानसभेत त्या म्हणाल्या की, जर फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी केली तर त्यांना राष्ट्रविरोधी म्हटले जाते. मात्र, या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. या मुद्यावर आम्ही म्हणजे काश्मिरींनी चर्चा नाही करायची तर, कोण चर्चा करणार?पाक करणार कारवाईइस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबा, अल-कायदा, तालिबान अशा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना व दहशतवादी लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्या संदर्भात काढलेल्या एका अध्यादेशावर त्या देशाचे अध्यक्ष ममनून हुसैन यांनी स्वाक्षरी केली.
कोसळत्या बर्फात कारवाई करून उधळला अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न, सीआरपीएफ कॅम्प होते लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:35 AM