करबुडवेगिरी अशक्य होईल
By admin | Published: March 24, 2017 11:58 PM2017-03-24T23:58:46+5:302017-03-24T23:58:46+5:30
देशातील काळ्या पैशांच्या उत्पत्तीचे सारे मार्ग केंद्र सरकारला बंद करायचे आहेत, त्यासाठी यापुढे प्रत्येक आर्थिक व्यवहारावर प्राप्तीकर
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
देशातील काळ्या पैशांच्या उत्पत्तीचे सारे मार्ग केंद्र सरकारला बंद करायचे आहेत, त्यासाठी यापुढे प्रत्येक आर्थिक व्यवहारावर प्राप्तीकर विभागाचे बारीक लक्ष असेल. प्राप्तीकर विवरणपत्रे आॅनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. साऱ्या प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशामध्ये करबुडवेगिरी यापुढे दिवसेंदिवस अशक्य होत जाणार आहे.
आॅनलाइन भरलेले सारे रिटर्न्स सर्वसाधारण वर्गात जमा होतात. एखाद्या आर्थिक व्यवहाराचा जरी त्यात पुरेसा खुलासा नसेल, तर प्राप्तीकर व्यवस्थेचे सॉफ्टवेरअर लगेच रेड अॅलर्ट दाखवू लागते, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत स्पष्ट केले आहे.
प्राप्तीकरासह तमाम आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या योजनेवर आक्षेप घेणाऱ्या मुद्द्याचे उत्तर देताना जेटली म्हणाले की, आधार कार्ड सुरुवातीला पॅन कार्डाशी संबंधित असेल. टप्प्याटप्प्याने आधार कार्ड हेच मुख्य कार्ड बनल्यावर अनेक कार्ड्स ठेवण्याची लोकांना गरजच उरणार नाही. तथापि, त्यासाठी काही काळ जावा लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)