नवी दिल्ली: सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 1984 शीख विरोधी दंगल आणि राफेल मुद्यावरुन संसदेतील वातावरण तापलं आहे. संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू असताना संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. संसद भवन परिसरात एका खासगी टॅक्सीनं बॅरिकेड्सला धडक दिली. यानंतर लगेचच सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले. संसद परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. संसदेच्या कामाकाजाला सुरुवात होत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण संसद परिसरातील जवानांनी आपापल्या जागा घेतल्या. सीआरपीएफच्या शीघ्र कृती दलानं संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ धाव घेत हा परिसर ताब्यात घेतला. यानंतर बॅरिकेड्सवर धडकलेल्या कारची तपासणी करण्यात आली. यामध्ये ही कार खासगी टॅक्सी असल्याची माहिती समोर आली. या कारमधून काही खासदार प्रवास करत होते. कारची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर अलर्ट रद्द करण्यात आला आणि परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. राफेल आणि शीख विरोधी दंगल यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ सुरू आहे. त्यामुळे लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
'त्या' टॅक्सीने संसदेबाहेर उडवला गोंधळ; सुरक्षारक्षकांची झाली पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:46 AM