हैदराबाद : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) दक्षिणेकडील मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा तेलगू देसम पार्टी (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडणाच्या मार्गावर आहे. याबाबतचे टीडीपीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संकेत दिले आहेत. काल (दि.1) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही, म्हणून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज झाले आहेत. त्यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी येत्या रविवारी टीडीपीच्या सर्व नेत्यांची तात्काळ बैठक बोलविली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर टीडीपीच्या खासदारांनी अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वे विभागासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच नवी राजधानी अमरावतीबाबातही कोणतीही घोषणा केली गेली नाही, असे पीडीपीच्या खासदारांनी सांगितले आहे. आम्ही याबाबात लवकरच निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे तीन पर्याय आहेत. सध्या प्रयत्न सुरु ते चालूच ठेवू. दुसरा म्हणजे पार्टीचे खासदार राजीनामे देणार आणि तिसरा पर्याय म्हणजे एनडीएतून बाहेर पडण्याबाबत आहे. दरम्यान, याबाबत आम्ही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार आहोत, असे टीडीपीचे खासदार टीजी व्यंकटेश यांनी दिल्लीत सांगितले. याचबरोबर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी चंद्राबाबूंनी एनडीएमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले.
एनडीएमधून टीडीपी बाहेर पडणाच्या मार्गावर? चंद्राबाबू नायडूंनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 4:12 PM