नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना विविध आॅनलाइन माध्यमांतून शिक्षण कसे द्यावे याविषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्रीय मानवसंसाधन विकास मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्ष वर्गात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला आॅनलाइन शिक्षण हा परिपूर्ण पर्याय नाही. त्यामुळे त्याचा वापर गरजेनुसारच करावा, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन शिक्षण जरूर द्या, पण त्याने अभ्यासाचा असह्य ताण पडून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडणार नाही, याची काळजी घेण्यावर त्यात भर देण्यात आला आहे.
मंत्रालयाने यासाठी ‘प्रज्ञाता’ या शीर्षकाची ३८ पानांची ेक सविस्तर पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यात आॅनलाइन शिक्षण कोणाला, कसे, कधी व किती वेळ दिले जावे याचे शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांच्या दृष्टीने साद्यंत विवेचन करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही मार्गदर्शिका तयार केली आहे. त्या केवळ सूचना आहेत. प्रत्येक राज्य स्थानिक परिस्थिती, साधनांची उपलब्धता व गरज यानुसार त्यात सोयीनुसार फेरबदल करू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.या पुस्तिकेची एकूण सहा प्रमुख विबागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सध्या ही मार्गदर्शिका आताची कोविडबाधित परिस्थिती विचारात घेऊन तयार करण्यात आली असली तरी देशातील शिक्षण एकूणच दर्जेदार व अधिक परिपूर्ण करण्याची नव्या काळाला अनुरूप अशी पद्धत यातूनच उभी राहू शकेल, असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला आहे. ही मार्गदर्शक पुस्तिका मंत्रालयाच्या mhrd.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.कोणाला किती वेळ शिकवावे?पूर्व प्राथमिक : बालवाडी, छोटा शिशू व मोठा शिशू वर्गातील मुलांना अजिबात नाही. फार तर आठवड्यातून एक दिवस ठरवून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याशी ३० मिनिटे संवाद.इयत्ता १ ली ते ८ वी : आठवड्यातून किती दिवस आॅनलाइन वर्ग घ्यावे हे राज्य सरकारांनी ठरवावे. परंतु त्या ठरलेल्या दिवशी प्रत्येकी ३०ते ४५ मिनिटांचे जास्तीत जास्त दोन वर्ग.इयत्ता ९ ते १२ वी : राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दिवशी प्रत्येकी ३० ते ४५ मिनिटांचे चार वर्ग.