अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 07:07 PM2018-03-25T19:07:06+5:302018-03-25T19:07:06+5:30
अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे.
नवी दिल्ली- अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे. अण्णांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दुस-या दिवशी म्हणजे काल हार्दिक अण्णांच्या भेटीसाठी गेला होता. परंतु अण्णांनी त्याला व्यासपीठावर येण्यास मज्जाव केला. त्यानंतर अपमानित झालेल्या हार्दिकनं अण्णांवरच आता गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
चांगल्या कामासाठी मी समर्थन देतो. अण्णांच्या आंदोलनाबाबत कधी त्यांच्याशी बोललो नाही. त्यामुळे समर्थन देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करण्यासाठी 'बेस्ट ऑफ लक', असं हार्दिक म्हणाला आहे. यावेळी हार्दिक पटेलनं अण्णांवर आरोपांचा भडिमार केला आहे. केजरीवालांना भेटीसाठी त्यांनी राजीनामा देऊनच मला भेटायला यावं, असं अण्णा म्हणत आहेत. केजरीवालांसाठी एवढी जाचक अट का ठेवली आहे ?,' असा सवालही हार्दिकनं उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात शेतकरी 200 किलोमीटर चालत विधानभवनावर धडकले, तेव्हा अण्णा कुठे होते? मध्य प्रदेशातील मनसरमध्ये दहा शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं, तेव्हा अण्णा कुठे होते? आम्ही सतत शेतकऱ्यांची आंदोलने छेडली, तेव्हा अण्णा कुठे होते?, असे प्रश्न उपस्थित करतानाच आताच अण्णांना शेतकरी का आठवले?, असं म्हणत हार्दिकनं अण्णांवर टीकेची झोड उठवली आहे.