नारीशक्तीचा विजय असो... 'जग जिंकून' मायदेशी परतल्या भारताच्या सहा 'जलसम्राज्ञी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 06:46 PM2018-05-21T18:46:00+5:302018-05-21T20:00:54+5:30
चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंतर मायभूमीवर परतल्या.
पणजी - चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंतर मायभूमीवर परतल्या. या दलाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी केले. पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या या रणरागिणींचे स्वागत नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी., लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा समावेश होता. या पृथ्वीप्रदक्षिणेसाठी वापरण्यात आलेल्या आयएनएस तारिणीबाबत माहिती देताना लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल म्हणाल्या, आयएनएस म्हादेईनंतर आयएनएस तारिणी ही अशा प्रकारची दुसरी नौका आहे. तिची बांधणी समुद्रातील वादळांचा सामना करण्यासाठी सक्षम अशी करण्यात आली आहे. वुडन फायबर-ग्लासने बनलेली ही नौका अनेक बाबतीत उत्तम असून, या प्रवासात तिने स्वत:ला सिद्ध केले आहे.
दरम्यान, जगप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या भारताच्या जलसम्राज्ञींचे स्वागत करताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या," तुम्ही मिळवलेल्या यशाबाबत मी आनंदी आहे. भारताची युवा पिढी जे काही मिळवत आहेत, ते महिला आणि पुरुष दोघांसाठीही खूप प्रेरणादायी आहे."
मोठ्या संकटाचा सामना
एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात १९४ दिवस या महिला अधिका-यांनी समुद्रात घालवले. या परिक्रमेत सहभागी पथकाचे नेतृत्त्व करणाº-या लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी अनुभव कथन करताना सांगितले की, ‘पहिले विषुववृत्त ओलांडल्यानंतर प्रवासाला गती आली. २३ आॅक्टोबर रोजी बोट आॅस्ट्रेलियात पोचली. तेथे बंदरात १२ दिवस राहिलो. ७ नोव्हेंबर रोजी प्रवासात असतानाच पायल हिचा वाढदिवस साजरा केला. केप होर्न बंदर ओलांडण्याआधीच मोठ्या संकटाचा सामना या अधिका-यांना करावा लागला. खराब हवामानामुळे समुद्र खवळला होता ताशी ६0 किलोमिटर वेगाने वाहणारे वारे आणि ८ मीटर उंचीच्या लाटा यातून मार्ग काढावा लागला. प्रत्यक्षात यमदूतच परीक्षा घेत होता. शेवटी हे बंदर पार करुन २६ फेब्रुवारी रोजी फॉकलँड बेटावर पोचलो.
बोटीच्या स्टीअरिंगमध्ये बिघाड
पोर्ट लुईपासून १८0 सागरी मैल अंतरावर असताना बोटीच्या स्टीअरिंगमध्ये बिघाड झाला. समुद्रातच तात्पुरती दुरुस्ती करुन बोट बंदरात आणावी लागली. नौदलाने तात्काळ सुटे भाग पुरविल्याने लवकर दुरुस्ती झाली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. २८ एप्रिल रोजी पोर्ट लुई बंदरातून परतीच्या प्रवासाला लागलो. ६ मे रोजी विषुववृत्त पार केले.
उद्या पंतप्रधानांची भेट
सागरी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करुन परतलेले नौदल महिला अधिका-यांचे हे पथक उद्या बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या साहसी प्रवासाचा अनुभव त्यांना कथन करणार आहे. मोदीजी या अधिका-यांशी संवाद साधतील. कार्यक्रमाला नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा तसेच नौदलाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.