हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या रिंगणात प्रत्येक राजकीय पक्ष कंबर कसून उतरले आहेत. सत्ताधारी पक्षावर बोचऱ्या शब्दांत टीका करण्यासाठी विरोधक अजिबात कसर सोडत नाहीयेत. एकूणच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चिखलफेक करण्यात सध्या व्यस्त आहेत. अशातच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मदरसे आणि मुस्लिमांची धार्मिक स्थळं बंद करण्याचा प्रयत्न सरू आहे आणि हे (सरकार) आपल्याला (मुस्लिमांना) पाहून घेऊ इच्छित नाहीत.
सैदाबाद येथील जनसभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी हे विधान केले आहे. ओवेसी पुढे असंही म्हणाले की, AIMIMला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार हैदराबादचा दौरा करत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केवळ पाच वेळाच येथे आले आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालप्रमाणेच ते (सरकार) आपला (मुस्लिम) आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
(मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारताच केसीआर यांनी काढला तरुणाचा बाप)
यावेळेस ओवैसींनी भाजपासह काँग्रेसवरही बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला. तेलंगणातील काँग्रेस-टीडीपी-सीपीआय-तेलंगणा जन समिती या आघाडीवर हल्लाबोल चढवताना ओवेसी म्हणाले की, टीडीपी आणि काँग्रेसचा पाकिटमार असा उल्लेख केला. शिवाय, राहुल गांधी एखाद्या पर्यटकाप्रमाणे राज्याचा दौरा करत आहेत. जानवेधारी राहुल आमचे दुःख कधीच समजू शकणार नाहीत, असा हल्लाबोलही त्यांनी चढवला आहे.
दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील 119 जागा निवडणुकीसाठी 7 डिसेंबर मतदान होणार आहे. यासाठी तेलंगणाचे के.चंद्रशेखरचे राव यांचा टीआरएस पक्ष आणि भाजपा स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत.