हैदराबाद : तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तेलंगणातकाँग्रेसची सत्ता आल्यास राज्यातील महिलांना दरमहा ४,००० रुपयांचा लाभ मिळू शकेल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, सामाजिक पेन्शन, एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात आणि मोफत बस प्रवास यासारख्या सुविधांमध्ये हा लाभ महिलांना मिळेल, असे राहुल गांधी म्हणाले.
कालेश्वरम प्रकल्पाच्या मेडीगड्डा (लक्ष्मी) बॅरेजजवळील अंबाथीपल्ली गावात महिलांच्या मेळाव्याला राहुल गांधी यांनी संबोधित केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कथितरित्या 'लूट' केलेले सर्व पैसे महिलांना 'परत' करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या लुटीचा सर्वाधिक फटका तेलंगणातील महिलांना बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी लुटलेले पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
याचबरोबर, राहुल गांधी म्हणाले की, पहिले पाऊल म्हणून प्रत्येक महिन्याला सामाजिक पेन्शन म्हणून महिलांच्या बँक खात्यात २५०० रुपये जमा केले जातील. तसेच, १,५०० रुपयांचीही बचत होणार आहे, कारण काँग्रेस सत्तेत आल्यास एलपीजी सिलिंडर ५०० रुपयांना मिळेल आणि महिला सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील, ज्यामुळे त्यांची सुमारे १,००० रुपयांची बचत होईल. या सगळ्यातून तुम्हाला दरमहा ४ हजार रुपयांचा फायदा होईल. याला पराजाला सरकार (लोकांचे सरकार) म्हणतात, असे राहुल गांधी म्हणाले.
तेलंगणात एक लाख कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, आगामी निवडणुकीत बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम एका बाजूला लढत आहेत, तर खरी लढत काँग्रेस आणि केसीआरच्या नेतृत्वातील बीएसआर यांच्यात होत आहे. एआयएमआयएम आणि भाजप हे बीआरएसला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे दोराला सरकार (सामंती सरकार) हटवून पराजाला सरकार (लोकांचे सरकार) स्थापन करण्यासाठी तुम्हाला काँग्रेसला पूर्ण पाठिंबा द्यावा लागेल.