नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता काही दिवसांत वाजणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी भाजपाने पुढाकार घेत १९५ जागांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्याचसोबत विविध राज्यात मित्रपक्ष यांच्यासोबत जागावाटपावर वाटाघाटी सुरू आहे. त्यात आता तेलुगु देशम नेता आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी गुरुवारी रात्री भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दीर्घ चर्चा केली.
या बैठकीला जनसेनेचे अध्यक्ष पवन कल्याण हेदेखील उपस्थित होते. बैठकीत आंध्र प्रदेशमध्ये भाजपा, तेलुगु देशम आणि जनसेना यांच्या आघाडीला अंतिम रुप देण्यात येत आहे. आंध्र प्रदेशात एनडीएच्या विस्तारासाठी भाजपाने तेलुगु देशम आणि जनसेना यांच्यासोबत आघाडी करत जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. चंद्रबाबू नायडू यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत आघाडी आणि जागावाटप यावर चर्चा झाल्याचे बोलले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील २५ जागांपैकी भाजपा ८ जागांवर निवडणूक लढवू शकते. तर जनसेना यांच्या वाट्याला ३ जागा येण्याची शक्यता आहे. तर इतर १४ जागांवर तेलुगु देशम पार्टी निवडणूक लढवू शकते. पण तेलुगु देशम पार्टीला आणखी काही जागा हव्या आहेत. त्यामुळेच रात्री उशिरापर्यंत भाजपा नेत्यांसोबत नायडू यांनी दीर्घ बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच आघाडीबाबत घोषणा होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे, यंदा ४०० चा पारचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला दक्षिण भारतातील राज्यात ही आघाडी फायदेशीर ठरू शकते. कारण भाजपा कर्नाटकाशिवाय इतर कुठल्याही दक्षिणेकडील राज्यात फारसं यश मिळवू शकली नाही. मागील लोकसभा निवडणुकीत ५ राज्यांच्या १०० हून अधिक लोकसभा जागांपैकी केवळ २९ जागांवर भाजपाचा विजय झाला होता. त्यात २५ जागा कर्नाटक, ४ तेलंगणातून होत्या. जर तेलुगु देशम पार्टी पुन्हा NDA मध्ये आली तर भाजपाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.