एस. के. गुप्ता नवी दिल्ली : बोर्डाची परीक्षा न देता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार नाही, असे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सोमवारी स्पष्ट केले. परीक्षांच्या तारखा जोपर्यंत जाहीर केल्या जात नाही तोपर्यंत लॉकडाऊनच्या दिवसांत विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी करावी, असेही ते म्हणाले. निशंक यांनी सोमवारी टिष्ट्वटर व फेसबुकवर विद्यार्थी-पालक यांच्याशी लाईव्ह संवाद साधला तेव्हा त्यांनी परीक्षांच्या तारखांबद्दल केले जात असलेले अंदाज फेटाळून लावले. विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक सत्राला विलंब होत असल्याचे सांगून आम्हाला परीक्षा न घेताच उत्तीर्ण करून टाका, असे आवाहन केले. त्यावर निशंक यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागेल, असे स्पष्ट केले.बोर्डाच्या मुख्य विषयांच्या परीक्षांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जातील.मंत्री निशंक यांनी जेईई आणि नीट परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले की, देशासमोरील कोरोनाचे संकट पाहता जेईई व नीट परीक्षांना मे महिन्यानंतर निश्चित केले आहे. शाळा कधी सुरू होतील, असे पालकांनी विचारल्यावर निशंक म्हणाले, मुलांचे जीवन सगळ््यात महत्वाचे आहे. परिस्थिती पूर्ववत होताच शाळा सुरू होऊन परीक्षाही होतील. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला.निशंक यांनी सांगितले की, नव्या शिक्षण धोरणात तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना शिकणे आणि शिकवणे सहज असावे यावर काम करण्यात आले आहे. मुलांसाठी रोजच्या व्यवहारातील वस्तुंचे व्हिडियो बनवून त्यांना शिकवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यांनी व्हॉटसअॅप आणि व्हिडियो लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या शिक्षकांची प्रशंसा केली.<पुस्तके राज्यांना पाठविली आहेतएनसीईआरटीची पुस्तके न मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर मंत्री म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या आदेशावरून गृह मंत्रालयाने पुस्तकांची विक्री खुली केली. एनसीईआरटीने पुस्तके राज्यांना पाठवून दिली आहेत. लवकरच ती बाजारात मिळतील. याशिवाय एनसीईआरटीच्या ई-पाठशाला अॅपवरून पुस्तके डाऊनलोड केली जाऊ शकतात. देशात सहा हजारांपेक्षा जास्त व्हिडिओ आणि दोन हजारांपेक्षा जास्त लेक्चर्स तयार आहेत. ते ई-क्लासेसच्या माध्यमातून आणि फ्री डिशवर दूरदर्शनच्या वाहिन्यांवर प्रसारीत केले जात आहे.
दहावी, बारावी परीक्षा द्याव्याच लागतील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:00 AM