टेरर फंडिंग प्रकरणात गिलानीच्या दुस-या मुलाला NIAनं बजावलं समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 12:30 PM2017-07-31T12:30:17+5:302017-07-31T12:33:29+5:30

हुर्रियत कॉन्फरन्सचे फुटीरतावादी नेते गिलानी यांच्या मुलाला टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएनं समन्स बजावलं आहे.

Terror Funding case, the second child of Gilani was summoned by the NIA | टेरर फंडिंग प्रकरणात गिलानीच्या दुस-या मुलाला NIAनं बजावलं समन्स

टेरर फंडिंग प्रकरणात गिलानीच्या दुस-या मुलाला NIAनं बजावलं समन्स

Next
ठळक मुद्देहुर्रियत कॉन्फरन्सचे फुटीरतावादी नेते गिलानी यांच्या मुलाला टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएनं समन्स बजावलं आहे. देवेंद्र सिंह बहल यांच्या घर आणि कार्यालयावर एनआयएनं छापेमारी केली आहे. टेरर फंडिंगचे धागेदोरे हे पाकिस्तान उच्चायुक्तापर्यंत पसरल्याचंही समोर आलं आहे

नवी दिल्ली, दि. 31 - हुर्रियत कॉन्फरन्सचे फुटीरतावादी नेते गिलानी यांच्या मुलाला टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएनं समन्स बजावलं आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जवळचे देवेंद्र सिंह बहल यांच्या घर आणि कार्यालयावर एनआयएनं छापेमारी केली आहे. टेरर फंडिंगचे धागेदोरे हे पाकिस्तान उच्चायुक्तापर्यंत पसरल्याचंही समोर आलं आहे. आता त्याच प्रकरणात सय्यद अली शाह गिलानी यांच्या मुलाची चौकशी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र सिंह बहल यांचं पाक उच्चायुक्तालयात दररोज जाणं-येणं होतं. देवेंद्रसोबत येथे येणा-यांमध्ये गिलानीशिवाय, मीरवाइज आणि शब्बीर शाह यांचंही नाव आहे. गिलानी यांच्या जवळचे सहयोगी बहल हे फुटीरतावादी संघटनांच्या लीगल विंगचे सदस्यसुद्धा आहेत. एनआयएच्या माहितीनुसार, बहल दहशतवाद्यांच्या अंतिम संस्कारात नियमित सहभागी होत असतात. पाकिस्तानमध्ये बसलेले हँडलर पैसे घेऊन ते फुटीरतावादी नेत्यांपर्यंत पोहोचवत असल्याचा एनआयएला संशय आहे. छापेमारीत बहल याच्या घरातून गुन्हेगारीशी संबंधित दस्तावेज, चार मोबाइल फोन, एक टॅबलेट, कॉम्प्युटर आणि काही इतर सामान जप्त करण्यात आलं आहे. आता त्याची चौकशी सुरू आहे.

टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएनं गिलानी यांचा दुसरा मुलगा नसीमला समन्स पाठवलं असून, त्याला एनआयए समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी एनआयएनंही गिलानी याचा मोठा मुलगा नईमला शनिवारी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्याच वेळी नईमला प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्रीनगरमधल्या एका  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी फुटीरतावादी नेत्यांनी सीमेपलिकडून निधी येत असल्याचं कॅमे-यासमोर कबूल केलं होतं. त्यानंतर एनआयएनंही फुटीरतावादी नेत्यांविरोधात मोहीमच उघडली होती. मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला फुटीरवादी नेता शब्बीर शाह याला कोर्टाने सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली आहे.  
फुटीरवादी आणि हुर्रियत नेता शब्बीर शाह याला पोलिसांनी अटक केली होती. त्यांनतर त्याला दिल्लीला आणण्यात आले. शब्बीर शाहला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात दाखल केले असता, कोर्टाने त्याला सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शब्बीर शाहला सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा समन्स पाठवले होते. तरीही तो सक्तवसुली संचालनालयासमोर हजर राहिला नाही. अखेर त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते. 

Web Title: Terror Funding case, the second child of Gilani was summoned by the NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.