जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर राम मंदिराविरोधात रचतोय कट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:30 PM2018-12-05T12:30:48+5:302018-12-05T13:19:45+5:30
राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे.
नवी दिल्ली - राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे. राम मंदिराची निर्मिती झाली तर दिल्ली ते काबूलपर्यंत दंगली उसळतील असा इशाराच मसूदने दिला आहे.
'बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावण्यात आली. त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचे मंदिर बांधण्यात आले. आता त्याच जागेवर रामाचे भव्य मंदिर बांधण्याची मागणी होते आहे. जे मागणी करत आहेत त्यांच्या हाती तलवार आणि त्रिशूळ आहे. तर मुस्लिम बांधव घाबरलेले आहेत. बाबरी मशीद आम्हाला बोलावते आहे. आमच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे. आम्ही मुस्लिम बांधवांसाठी मशीद पुन्हा उभारू. अल्लासाठी आमचे प्राणही हजर आहेत. राम मंदिराची निर्मिती त्या जागेवर व्हायला नको, ती जागा मशिदीची आहे. आता राम मंदिर जर त्या जागी बांधले गेले तर दिल्ली ते काबूलपर्यंत हिंसाचार माजवू, दंगली घडवू हे याद राखा' असे मसूद अजहरने म्हटले आहे.
भारतात राम मंदिर बांधल्यास अराजकता निर्माण करण्याची धमकी देणाऱ्या अजहरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'पुन्हा राम मंदिरावरून धमकी दिल्यास मसूद अजहरवरच सर्जिकल स्ट्राइक करू,' असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. राजस्थान येथे निवडणूक प्रचाराच्या रॅलीत बोलताना योगींनी हे म्हटलं आहे. 'राम मंदिर उभारण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. राम मंदिरावरून मसूद अजहर आम्हाला धमकावत असेल तर पुढच्या सर्जिकल स्ट्राइकवेळी त्याच्यासारख्या दहशतवाद्यांचाच खात्मा केला जाईल,' असं योगी म्हणाले.
मसूद अजहरला 1994 मध्ये भारतीय सुरक्षा जवानांनी अटक केली होती. पण पाच वर्षानंतर 1999 मध्ये कंधार विमान अपहरण करत दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस ठेवत त्यांच्या बदल्यात मसूद अजहरची सुटका केली होती. सध्या मसूद अजहरची जैश-ए-मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटना अडचणीत सापडल्या आहेत. भारतात झालेल्या संसद हल्ल्यासह अनेक हल्ल्यांचा तो मास्टरमाइंड आहे. तसेच भारताने जारी केलेल्या टॉप 20 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतही त्याचा समावेश आहे.