दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:53 PM2018-09-14T23:53:18+5:302018-09-14T23:54:11+5:30

भारत, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचा सहभाग

Terrorists can not be eliminated; BIMSTEC | दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव

दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव

Next

पुणे : एका प्रायमरी स्कूलमध्ये काही दहशतवादी घुसले... चिमुकल्यांचे रडण्याचे येणारे आवाज... तेवढ्यात हेलिकॉप्टरमधून काही सैनिकांनी उड्या मारल्या आणि स्कूलला घेरले. थोडी जरी चूक झाली, तर चिमुकल्यांच्या जिवावर बेतणार होते. त्यामुळे सैनिक हळूहळू पुढे सरकत होते आणि त्यांनी स्कूलमध्ये प्रवेश करून सर्व दहशतवाद्यांना संपविले. हा थरारक अनुभव औंध मिलिटरी स्टेशनवर आज आला.
निमित्त होते ‘बिम्सटेक’ (बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅँड इकॉनॉमिक को-आॅपरेशन)तर्फे आयोजित केलेल्या युद्धसरावाचे. या सरावात भारत, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका सहभागी झाले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी हे देश एकत्र आले आहेत. प्रत्येक देशाकडून ३० जणांची तुकडी यात सहभागी झाली आहे. नेपाळ आणि थायलंड यांनी केवळ त्यांचे निरीक्षक पाठविले आहेत. हा सराव सहा दिवसांचा असून, येत्या १६ सप्टेंबर रोजी त्याचा समारोप होईल. या प्रसंगी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, सर्व सहभागी राष्ट्रांचे लष्करप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सध्या संपूर्ण जगात दहशतवाद्यांची समस्या गंभीर बनली आहे. त्याचा सामना करण्यासाठी भारताने शेजारील देशांना सोबत घेऊन युद्धसराव सुरू केला आहे. या सरावात इतर देशांचे सैनिक एकमेकांसोबत राहून दहशतवाद कसा संपवता येईल, त्याच्याशी कसे लढता येईल, याचा प्रत्यक्ष अनुभव औंध मिलिटरी स्टेशनवर घेत आहेत.
व्हाइट हाऊस, ब्राऊन हाऊस, ग्रीन हाऊस असे विविध प्रकारच्या ड्रिलचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यामधून सर्व देशांनी दहशतवाद्यांशी कसे संपविले, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले.

सांस्कृतिक देवाणघेवाण अन् मैत्रीचे नाते
पाच देशांचे जवान एकत्र आल्याने त्यांच्यात युद्धसराव तर होतच आहे; पण त्यासोबतच आपापल्या देशाची सांस्कृतिक देवाणघेवाण, भाषा, वेशभूषा त्यांना शिकायला मिळत आहे. पाचही देश जवळपास सारख्या संस्कृतीचे आहेत.
बांगलादेश, भारतीय जवान हिंदीत बोलून संवाद साधत आहेत. तर, श्रीलंकन जवानांना हिंदी समजते; परंतु बोलता येत नाही. ते इंग्रजीमध्ये बोलतात. म्यानमार आणि भूतानचे जवानही इंग्रजीमधून संवाद साधत आहेत. एकमेकांसोबत जेवताना, सराव करताना ते मिळूनमिसळून राहत असल्याने त्यांच्यात मैत्रीचे नाते तयार झाले आहे.

11मिनिटांचा थरार
जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाच देशांचे सैनिक एकत्र आले होते. देश, भाषा, वेशभूषा, बोली जरी वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांचे ध्येय मात्र एकच होते. आणि ते होते दहशतवाद्यांना कंठस्रान घालण्याचे. एकत्र येऊन दहशतवाद्यांचा सामना केला, तर आपण नक्कीच जिंकू, असा विश्वासच जणू या वेळी अनुभवता आला. निमित्त होते ‘बिम्सटेक’तर्फे आयोजित युद्धसरावाचे.
‘बिम्सटेक’ या बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅँड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक)च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स १८’ हा पहिल्या लष्करी युद्धसराव घेण्यात येत आहे. या सरावाचे प्रात्याक्षिक आज (दि.१४) औंध येथील मिलिटरी स्टेशनवर दाखविण्यात आले. या सरावात भारत, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका सहभागी झाले आहेत.
‘जंगल लेन शूटिंग रेंज’ या नावाचे ड्रिल पाच देशांच्या सैनिकांना देण्यात आले. जंगलात ठिकठिकाणी दहशतवादी लपले होते.
त्यामुळे कुठून कधी गोळी येईल आणि प्राण जाईल, याची शाश्वती नव्हती. परंतु, या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी
पाचही देशांचे सैनिक नदीतून राफेलमध्ये बसून जंगलात प्रवेश करतात. त्यांच्या नजरा दहशतवाद्यांना शोधत असतात. सर्व जण
दबक्या पावलांनी पुढे जात असतानाच डाव्या बाजूला झाडामागे लपलेल्या दहशतवाद्याला भूतानच्या सैनिकाने अचूक टिपले.
ते पाहून इतर सैनिकांमधील जोश वाढला. तेवढ्यात समोरून येणाऱ्याचा नेम बांगलादेशी सैनिकाने साधला. पाचही सैनिक जात, धर्म, भाषा, देश सर्व भेद विसरून केवळ दहशतवाद्यांना मारण्याच्या इराद्याने पुढे सरकत होते. सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात सर्वांनी मिळून अवघ्या ११ा मिनिटांमध्ये सुमारे दहा ते पंधरा दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि एकजुटीने दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचा विश्वासच दिला.

Web Title: Terrorists can not be eliminated; BIMSTEC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.