जामनगर : गुजरातच्या जामनगर येथे जागतिक पारंपरिक चिकित्सा केंद्राचे पंतप्रधान माेदींनी उद्घाटन केले. जगात या माध्यमातून पारंपरिक चिकित्सा युगाची सुरुवात हाेणार असल्याचे पंतप्रधान माेदी म्हणाले. यावेळी जागतिक आराेग्य संघटनेचे प्रमुख डाॅ. टेड्राेस घेब्रियसस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. डाॅ. घेब्रियसस यांनी गुजराती भाषेत अभिवादन करून उपस्थित नागरिकांची मनं जिंकली. पंतप्रधान माेदींनी सांगितले की, पारंपरिक औषधांच्या या केंद्राच्या माध्यमातून डब्ल्यूएचओने भारतासाेबत एक नवी भागीदारी केली आहे. हा भारताचा गाैरव आहे. पुढील २५ वर्षांमध्ये जागतिक स्तरावरील एका नव्या युगाची यावेळी सुरुवात हाेत आहे. भारतातील पारंपरिक चिकित्सा पद्धती केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून ते आयुष्याचे समग्र विज्ञान असल्याचे माेदी म्हणाले. डब्ल्यूएचओने जागतिक आराेग्य आणि निराेगी जीवनमानासाठी आयुर्वेदाचा प्रचार करण्याचे आवाहन केंद्रीय आराेग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी डाॅ. घेब्रियसस यांना केले. डाॅ. घेब्रियसस यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी आयुर्वेदामध्ये संशाेधन आणि उपचार पद्धतीला प्रात्साहन देण्याचे आवाहनही केले.
दूध उत्पादनात भारत जगात आहे अग्रणी -दूध उत्पादनात भारत जगात अग्रणी आहे. भारत वर्षाला ८.५ लाख कोटी रुपयांचे दुधाचे उत्पादन करतो. दुग्धोत्पादन क्षेत्रातून छोटे शेतकरी हे मोठे लाभार्थी आहेत, असे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सांगितले. लाभार्थ्यांच्या खात्यात १०० टक्के पैसा जमा होईल, असा माझा कटाक्ष असतो. बनास डेअरीतील एक नवीन दुग्धशाळा संकुल आणि बटाटे प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटनांतर ते बनासकांठा जिल्ह्यातील दियोदर येथे एका सभेत बोलत होते.