वेळोवळी शेजारधर्म म्हणून संकटकाळात धावून जाणाऱ्या भारताविरोधातमालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी कठोर भुमिका घेतली आहे. भारतविरोधी असलेल्या मुइज्जू यांनी चीनच्या पाच दिवसांच्या दौऱ्याहून येताच भारतीय सैन्याने १५ मार्चपर्यंत आपला देश सोडावा, असे वक्तव्य केले आहे.
गेल्या काही काळापासून मालदीव आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. मालदीवच्या जनतेने भारतधार्जिने सरकार पाडून चीनधार्जिने सरकार निवडून दिले आहे. यामुळे मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैन्याला या नव्या सरकारने विरोध केला आहे. आमचा देश छोटा जरी असला तरी कोणाला धमकी देण्याचे लायसन मिळणार नाही, असे मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटले आहे. याचबरोबर भारतीय सैन्याने आपले सैनिक १५ मार्चपर्यंत माघारी घ्यावेत असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
मोहम्मद मुइज्जू पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते, त्यांनी परतताच भारत विरोधी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. मुइज्जू यांच्या वक्तव्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारण हे राजकारण असतं. त्यामुळे प्रत्येक देश भारताला पाठिंबा देईल याची शाश्वती नाही. गेल्या दहा वर्षांत भारताने प्रचंड यश मिळवले आहे आणि जगभरातील संबंध दृढ केले आहेत. पण बदलत्या राजकारणासोबत परदेशातील लोकांची भारताप्रती सद्भावना राहतील आणि आपल्याशी चांगल्या संबंधांचे महत्त्व समजेल याची काळजी घेणे आवश्यक आहे, असं एस. जयशंकर म्हणाले.
मोहम्मद मुइज्जू यांनी चीनकडे मागितली दाद
मालदीववर बहिष्कार घालण्याच्या भारतात सुरू असलेल्या ट्रेंडमध्ये मोहम्मद मुइज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक चिनी पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले होते. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मोहम्मद मुइज्जू म्हणाले होते की, कोरोनापूर्वी आपल्या देशात येणारे बहुतेक पर्यटक हे चीनचे होते.
नेमका वाद काय?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यातील काही फोटोंवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजकीय वाद अधिक वाढला आहे. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले.