कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर अनेक जण आपलं स्वप्न पूर्ण करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये राहणारे हिमांशू गुप्ता (Himanshu Gupta) यांनी चहाच्या स्टॉलवर काम करत चहा विकला होता. पण नंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आणि आयएएस अधिकारी बनण्यासाठी सर्व अडचणींवर मात केली. हिमांशू हे तीन वेळा UPSC परीक्षेत बसले, यासाठी कोणताही क्लास लावला नाही. मात्र स्वत: अभ्यास करून UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 मध्ये 304 वा क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले.
हिमांशू गुप्ता यांच्या वडिलांचं चहाचं छोटसं दुकान होतं आणि हिमांशू वडिलांच्या दुकानात चहा देण्याचं काम करायचे. हिमांशू यांनी चहाच्या दुकानात काम करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि मोकळ्या वेळेत वर्तमानपत्र वाचायचे. हिमांशू यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. जेव्हा त्यांना हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्यांना तिथे राहण्यासाठी पैशांची गरज होती.
पैसे मिळावे म्हणून त्यांनी क्लास घेतले आणि पेड ब्लॉगही लिहिले. हिमांशू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पहिल्यांदाच मेट्रो सिटीमध्ये आले होते. हिंदू कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर हिमांशू यांना चांगली नोकरी मिळाली पण त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हिमांशू यांनी एका सरकारी महाविद्यालयात रिसर्च स्कॉलर म्हणून प्रवेश घेतला.
हिमांशू यांनी एनवायरमेंटल सायन्समध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. ते त्यांच्या बॅचचे टॉपर होते. त्यांना परदेशातून पीएचडी करण्याची उत्तम संधी होती पण त्यांनी त्याऐवजी सिव्हिल सर्व्हिसेस जाणं पसंत केलं. हिमांशू यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली पण त्याला कमी रँक मिळाला आणि त्याची IRTS साठी निवड झाली. त्यामुळेच त्याने यूपीएससी परीक्षेत पुन्हा बसण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"