अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांच्या घरातून जवळपास पाच लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. शंकर सिंह वाघेला यांच्या जवळच्या व्यक्तीकडून गांधीनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, शंकर सिंह वाघेला यांच्या घरातील पहारेकऱ्यावर (चौकीदार) संशय व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.
चोरीची घटना शंकर सिंह वाघेला यांच्या गांधीनगरमधील निवासस्थानी झाली आहे. शंकर सिंह वाघेला यांच्या जवळचे सूर्यसिंह चावडा यांनी याप्रकरणी पेथापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तीन लाखांची रोकड आणि दोन लाख रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी गेल्या चार वर्षांपासून शंकर सिंह वाघेला यांच्या घराची देखभाल करण्यासाठी वासुदेव नेपाळी या व्यक्तीला सिक्युरिटी म्हणून नोकरीला ठेवण्यात आले होते. वासुदेव नेपाली हा आपल्या कुटुंबीयांसह या घरात राहत होता. त्यानंतर वासुदेव नेपाळी आपल्या कुटुंबासह ऑक्टोबर महिन्यात परतलाच नाही. घरातील तिजोरीत पैसे आणि सोने ठेवण्यात आले होते. त्या तिजोरीचा वापर फक्त वासुदेव नेपाळी करत होता. त्यामुळे त्याच्यावर चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर सिंह वाघेला यांच्या कुटुंबीय एका लग्न कार्यासाठी तिजोरीतील दागिने काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी पैसे आणि सोन्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पेथापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.