हैदराबाद - तेलंगणाचेमुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपप्रणित केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. त्यासोबतच, राज्यातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बांडी संजय यांनाही इशारा दिलाय. बांडी संजय यांनी लूट टॉकपासून दूर राहावं, अन्यथा आम्ही त्यांची जीभ हासडू, असे राव यांनी म्हटले आहे. त्यावरुन, आता राजकीय वातावरण खवळल्याचे दिसून येते. भाजपचे निझामाबादचे खासदार अरविंद धर्मापुरी यांनी केसीआर यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच, मोदींसोबत पंगा न घेण्याचं त्यांनी सूचवलंय.
संजय हे तेलंगणातील शेतकऱ्यांना धान्याची शेती करायला सांगत आहेत. तसेच, त्यांचे धान्य खरेदी केली जाईल, असे खोटे आश्वासन भाजपकडून त्यांना देण्यात येत आहे. केंद्र सरकारने धान्य खरेदी करणार नसल्याचे सांगितले आहे, त्यामुळेच कृषीमंत्र्यांनी दुसरे पीक घेण्याचे शेतकऱ्यांना सूचवलं आहे. केंद्र सरकार जबाबदारी ढकलून व्यवहार करत असल्याचा आरोप चंद्रशेखर राव यांनी केला आहे. तसेच, मी स्वत: केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे गेलो होतो, त्यावेळी शेतकऱ्यांचा तांदुळ खरेदी करण्याची मागणी केली. त्यावर, विचार करुन कळवू असे सांगण्यात आले. मात्र, अद्याप कुठलाही निरोप नसल्याचे राव यांनी सांगितले. त्यामुळे, राव यांनी राज्याचे भाजप प्रमुख संजय यांच्यावर निशाणा साधला होता.
राव यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केल्यामुळे भाजप खासदार अरविंद धर्मापुरी यांनी केसीआर यांच्यावर प्रहार केला आहे. जब गिधड की मौत आती है, तो वो शहर की तरफ भागता आहे, असा डायलॉग म्हणत धर्मापुरी यांनी राव यांना इशाराच दिलाय. जेव्हा केसीआर यांचा राजकीय बळी जाण्याची वेळ येते, तेव्हा ते मोदींसोबत पंगा घेतात आणि मोदी सरकारशी खोटं बोलतात, असे धर्मापुरी यांनी म्हटलं आहे. धर्मापुरी यांच्या या विधानामुळे आता केसीआर काय, प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, केसीआर आणि भाजप यांच्यात शाब्दीक युद्ध पेटल्याचं दिसून येतंय.