बिहारमध्ये मोदींचे हात आणि गळा कापणारे खूपजण आहेत, राबडी देवींचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 01:29 PM2017-11-22T13:29:14+5:302017-11-22T17:28:48+5:30
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात कापणारे, गळा कापणारे खूपजण आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केलं आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याच्या नादात राबडी देवी यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं
पाटणा - बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात कापणारे, गळा कापणारे खूपजण आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी केलं आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याच्या नादात राबडी देवी यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं. 'ते लोक म्हणतात नरेंद्र मोदींकडे जर कोणी बोट रोखले तर बोट तोडून टाकणार, हात कापून टाकणार. कापून तर दाखवा. संपुर्ण देशातील जनता, बिहारमधील लोक शांत बसणार का ? इथे मोदींचा हात कापणारे, गळा कापणारे खूपजण उभे आहेत', असं वक्तव्य राबडी देवी यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले. ही बाब प्रत्येकासाठी अभिमानाची असली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यावर जर कोणी बोट रोखले किंवा हात दाखवला तर ते बोट किंवा हातच छाटून टाकू, असे धक्कादायक वक्तव्य बिहार भाजपाचे अध्यक्ष व उजियारपूरचे खासदार नित्यानंद राय यांनी केले होते. या प्रकरणाची भाजपाने गंभीर दखल घेतली असून, नेत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
#WATCH: Many in Bihar ready to slit PM's throat and chop his hand, says Former Bihar Chief Minister Rabri Devi (21.11.17) pic.twitter.com/nTbOe7jC6f
— ANI (@ANI) November 22, 2017
वैश्य आणि कनू (ओबीसी) समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सोमवारी बोलत होते. अतिशय सामान्य परिस्थितीतून पंतप्रधान बनण्यापर्यंतच्या मोदी यांच्या प्रवासाचा उल्लेख करून राय म्हणाले होते की, त्या परिस्थितीतून बाहेर पडून ते पंतप्रधान बनले आहेत. गरिबाचा मुलगा, प्रत्येकाला त्याचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळेच मोदी यांच्या दिशेने दाखवले जाणारे बोट, दाखवला जाणारा हात आम्ही सगळे मिळून एकतर तोडून टाकू वा गरज भासली तर छाटूनच टाकू.
Wo log kehte hain, Narendra Modi pe ungli uthayenge to ungli tod denge, haath kaat denge. Kaat ke dhikao. Pure desh ke log, Bihar ke log kya chup baithe rahenge? Yahan Modi ka haath kaatne waale, gala kaatne wale bohot log khade hain: Former Bihar CM Rabri Devi pic.twitter.com/bquBpnoIgP
— ANI (@ANI) November 22, 2017
नंतर अपेक्षित माघार
या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुशील मोदी उपस्थित होते. राय यांच्याशी या वक्तव्याविषयी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी बोटे तोडण्याची किंवा हात मोडण्याची भाषा वापरली ती देशाचा अभिमान व सुरक्षेविरोधात जर कोणी बोलले तर त्याला योग्य तो संदेश देण्यासाठीच. माझे विधान हे कोणा व्यक्तीला वा विरोधी पक्षांना लक्ष्य करून नव्हते.
संयमित भाषा वापरण्याचे नेत्यांना देणार प्रशिक्षण
सर्वच नेत्यांच्या एकूणच वर्तनात शिस्त आणण्यासाठी भाजपा नेत्यांना संयमित भाषा वापरण्याचे प्रशिक्षण देणार आहे. राय यांनी नंतर वक्तव्य मागे घेतले असले तरी यावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. भाजपाला एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावरून मागे हटावे लागण्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळेच नेत्यांना संयमित भाषेचा वापर शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यामुळे नेत्यांना असे बॅकफूटवर यावे लागणार नाही.