साबरमती नदीत जिवंत कोविड विषाणू नाहीत; ‘आयआयटी-जीएन’चे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 06:00 AM2021-06-20T06:00:52+5:302021-06-20T06:01:01+5:30
मनीषकुमार यांनी साबरमतीच्या पाण्यावर केलेल्या संशोधनात ‘सार्स-कोव्ह-२’ विषाणू सापडल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.
अहमदाबाद : साबरमती नदीच्या पाण्यात संक्रमणशील जिवंत कोविड विषाणू सापडलेले नाहीत, असे स्पष्टिकरण इंडियन इन्स्टिट्यूट आफॅ टेक्नॉलॉजी गांधीनगरचे (आयआयटी-जीएन) प्राध्यापक मनीषकुमार यांनी दिले आहे.
मनीषकुमार यांनी साबरमतीच्या पाण्यावर केलेल्या संशोधनात ‘सार्स-कोव्ह-२’ विषाणू सापडल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. व्हॉटसॲपवर यासंबंधीच्या पोस्ट फिरू लागल्यामुळे अहमदाबाद शहरात घबराट पसली होती. तसेच शहराचे प्रशासन आणि गुजरात शासन यांच्याकडून संशोधकांकडे सातत्याने विचारणा होऊ लागली होती. त्यामुळे प्रा. मनीषकुमार यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. पाण्यातील विषाणूपासून मनुष्याला संसर्ग होऊ शकत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मनुष्यात संक्रमित होऊ शकत नाही-
मनीषकुमार यांनी सांगितले की, आम्हाला कोरोना विषाणूचा एकही जिवंत नमुना सापडलेला नाही. विषाणूच्या जीन्सचे काही तुकडे आम्हाला सापडले आहेत. कोविड रुग्णांच्या मलमूत्रातून ते पाण्यात आले. हा संपूर्ण विषाणू नाही. तो मनुष्यांत संक्रमितही होऊ शकत नाही तसेच कोविड संसर्गाचे कारणही बनू शकत नाही. साबरमतीच्या पाण्यात कोविड विषाणू सापडल्याच्या बातम्या एका शोधनिबंधाच्या हवाल्याने दिल्या गेल्या होत्या. अहमदाबाद आणि गुवाहाटी या दोन शहरांत केलेल्या अभ्यासावर हा शोधनिबंध आधारित होता.