भारताच्या आत्म्यात सौहार्द आहे, मूर्तिकार अनिल राम सुतार यांची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:29 AM2019-11-10T03:29:08+5:302019-11-10T03:29:26+5:30
रामाच्या २५१ मीटर उंच मूर्तीचे काम करणा-या मूर्तिकार अनिल राम सुतार यांनी म्हटले आहे की, अयोध्येचा निकाल सर्व पक्षांनी स्वीकार करायला हवा.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : शरयू तीरावर उभारण्यात येणाऱ्या रामाच्या २५१ मीटर उंच मूर्तीचे काम करणा-या मूर्तिकार अनिल राम सुतार यांनी म्हटले आहे की, अयोध्येचा निकाल सर्व पक्षांनी स्वीकार करायला हवा. भारताच्या आत्म्यात सौहार्द आहे. त्याचे अनुसरण करावे.
अनिल राम सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शरयू तीरावर उभारण्यात येणारी मूर्ती ही गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा (१८२ मीटर) उंच आहे. याची बिल्डिंग ५१ मीटर उंच, तर मूर्ती ५५० फूट असणार आहे. या मूर्तीवर ५१ मीटरची छत्री असेल. ही मूर्ती पूर्णपणे भारतीय उत्पादनांपासून बनवलेली असेल. यात चिनी वा अन्य विदेशी वस्तू नसतील. भगवान रामाची मूर्ती शतप्रतिशत मेक इन इंडिया असेल.
अनिल राम सुतार म्हणाले की, लवकरच आपल्याला ही मूर्ती बनविण्याचे अधिकृत आदेश मिळतील. या मूर्तीचा अयोध्या निर्णयाशी कोणताही थेट संबंध नाही; पण भगवान रामाची मूर्ती आहे आणि अयोध्येचा निर्णय आला आहे. कदाचित, राज्य सरकार याबाबत वेगाने काम करील. एकदा आम्हाला आदेश मिळाले की, दिवस-रात्र काम करून ८०० ते १००० कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही ही मूर्ती अडीच ते तीन वर्षांत उभी करू. या मूर्तीने अयोध्येच्या वैभवात निश्चित भर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.