नेतृत्वाच्या मुद्यावर संघर्ष नाही; आज काश्मिरात परिस्थिती चांगली नाही - गुलाम नबी आझाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 10:53 AM2022-02-13T10:53:18+5:302022-02-13T10:53:25+5:30
मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली विशेष मुलाखत...
मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली विशेष मुलाखत...
देशात निवडणुका होत असताना आपला आवाज ऐकू येत नाही.
- याचे कारण कोणतेही राजकारण नाही, तर कोरोना आहे. कारण कोणत्याही निवडणुकीत मी नेहमीच रस्त्यावर उतरून प्रचार केलेला आहे. हेलिकॉप्टरने फारच कमी प्रचार केला. कोरोनामुळे यावेळीच नव्हे, तर मागील निवडणुकीतही मी जास्त गेलो नव्हतो.
परंतु कोरोना तर आता उतरणीला लागला आहे व आभासी रॅली सुरू आहेत.
- त्यासाठी तर माझी रेकॉर्डिंग सुरू आहे. निवडणूक आयोगाने १००० लोकांना रॅलीची परवानगी दिली. ही तर फारच कमी संख्या आहे. आता काही संख्या वाढविली आहे. मला मागणी खूप आहे; परंतु पुरवठा होत नाही.
आपल्याला पंजाबमध्ये स्टार कँपेनर बनविलेले नाही. आपले तेथे मोठे योगदान होते.
- आता यादीत नाव असो किंवा नसो ज्याला गरज असते ते बोलावून घेतात.
आपल्याला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तुम्ही कमी ठिकाणी दिसण्याचे हेही कारण असू शकते.
- त्याचा याच्याशी काही संबंध नाही. याबाबत एकाच व्यक्तीने कॉमेंट केली आहे. छोटे विचार करणाराच असे करू शकतो.
परंतु आपला पक्षही अशा कॉमेंटवर गप्प राहिला.
- मी यावर टिप्पणी करणार नाही. हा निवडणुकीचा काळ आहे. पाच राज्यांतील निवडणुका काँग्रेस व देशासाठी महत्त्वाच्या आहेत.
तर आपण काँग्रेसमध्ये त्या दिवसाची वाट पाहात आहात.
- आम्हीही त्या दिवसाची वाट पाहत आहोत. ज्या दिवशी हे होईल, त्या दिवशी काँग्रेसला कोणीही हरवू शकणार नाही.
काँग्रेसमध्ये असे अनेक नेते आहेत, जे अपेक्षा सोडून दुसऱ्या वाटेवर गेले आहेत.
- पक्षातच आणखी प्रयत्न करायला हवे होते, असे मी त्यांना सांगेन. आम्हा सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत.
मग संघर्ष कशाचा आहे?
- नेतृत्वावर आमचा संघर्ष नाही. एकेकाळी लढाई तलवारींनी होत होती. परंतु, आता वेगळ्या प्रकारे होत आहे. आता ती ट्विटरद्वारे होत आहे.
ज्या प्रकारे आपला पक्ष मोदी किंवा भाजपशी लढत आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे का?
- होय. फारच सुधारणा करण्याची गरज आहे. लढाई मैदानात लढली जाईल. मूलभूत राजकीय लढाई तर गाव व शहरांत आहे.
एनडीएला या पावलाने कोणता फायदा झाला?
- यामुळे एनडीएलाही नुकसान झाले. हे त्यांना जाणवले की नाही माहिती नाही; परंतु त्यांचे समर्थकही याच्या विरोधात आहेत. तिसरी मोठी चूक म्हणजे राज्याला केंद्रशासित बनविले. याची काहीच गरज नव्हती.
आपण भाजपशी मिळून जम्मू-काश्मीरमध्ये काही मार्ग काढाल, अशी चर्चा आहे.
- हे सर्व बकवास आहे.
काँग्रेसने म्हटले की, आपण पीसीसी प्रमुख व्हा.
- हे कधी सांगितले नाही आणि सांगितले असते तरी मी झालो नसतो.
परिसीमन आयोगाच्या अहवालावर आपले काय मत आहे?
- फार वाईट आहे. यात सातत्य आणि तर्कशुद्धता बिलकूल नाही. एक मतदारसंघ पावणेदोन लाखांचा, तर दुसरा ७० हजारांचा आहे. यात क्षेत्र, लोकसंख्या याबाबत तर्कशुद्धता नाही.
आपण काश्मीरचे बडे नेते आहात, आजची स्थिती कशी आहे?
- आज स्थिती बिलकूल चांगली नाही. एनडीएची सर्वांत मोठी चूक म्हणजे ३७०ला सर्वांत मोठे भूत बनविले. खरेखुरे ३७० पाहा. त्यात दोन गोष्टी राहिल्या होत्या, त्या महाराजा हरिसिंह यांनी १९२५मध्ये केल्या होत्या. बाहेरची व्यक्ती जमीन खरेदी करू शकत नाही व बाहेरची व्यक्ती नोकरी करू शकत नाही. इतर तर सर्व संपलेच होते, त्यासाठी काँग्रेसला दोष देणार असाल तर ते चुकीचे आहे. विशेष राज्याच्या दर्जासाठी आमच्या संविधानात तरतूद होती. आम्ही जेवढेही बदल केले आहेत, ते विधानसभेद्वारे केले. त्यामुळे लोकांना त्याबद्दल वाईट वाटले नाही. कारण त्यात सर्व पक्षांचे लोक होते.