नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही सर्वात आवडते नेते असून, सध्या तरी त्यांना कोणीच कडवी झुंज देत नसल्याचं समोर आलं आहे. टाइम्सच्या ऑनलाइन सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयानंतरही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण नरेंद्र मोदींनाच मत देणार असल्याचं 79 टक्के लोकांनी सांगितलं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच सध्या तरी सर्वात योग्य वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 12 ते 15 डिसेंबर दरम्यान हा सर्व्हे घेण्यात आला आहे.
सर्व्हेनुसार फक्त 20 टक्के लोकांनी आपण नरेंद्र मोदींना स्पर्धा देण्यासाठी राहुल गांधींना मत देणार असल्याचं सांगितलं आहे. 58 टक्के लोकांनी आपण राहुल गांधींपासून अद्यापही प्रभावित झालो नसल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे 34 टक्के लोकांनी राहुल गांधी मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरत असून, त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
पण काँग्रेससाठी चिंतेची बाब म्हणजे 73 टक्के लोकांनी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बढती करण्यात आल्यानंतरही काँग्रेस हा पक्ष पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. पण मग याचा अर्थ राहुल गांधींना हटवलं तर काँग्रेसची प्रगती होईल असा आहे का ? तर याचं उत्तर नाही आहे. कारण सर्व्हेत सहभागी 38 टक्के लोकांनी गांधी परिवारातील कुटुंब काँग्रेसचा अध्यक्ष नसेल तर त्यांना मत देणार नाही असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे 37 टक्के लोकांनी गांधी कुटुंबातील सदस्य अध्यक्ष नसेल तर काँग्रेसला मतदान करु असं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या स्पर्धेत अद्याप तरी राहुल गांधी खूप पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. महत्वाचं म्हणजे भाजपाला मिळणा-या समर्थनामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही तितकाच वाटा आहे. सोबतच भाजपानेही आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे. कारण 31 टक्के लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील तर आपण भाजपाला मतदान करणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. तर 48 टक्के लोकांनी नेता कोणीही असला तरी भाजपाला मतदान करु असं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली आहे एवढं मात्र नक्की.