नागपूर, दि. 12- काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना भोंदू बाबांच्या यादीमध्ये रामदेव यांचं नाव नसल्यामुळे मी निराश झाल्याचं ट्विट केलं होतं. याबाबत बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांचं देशाकरता काही योगदान नाही, दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हंटलं आहे. तसंच बलात्कार प्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबद्दलही रामदेव बाबा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. बाबा राम रहिमवर झालेली कारवाई योग्यच आहे. जो बाबा चुकीचं काम करत असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. ‘पतंजली’च्या वितरकांच्या संमेलनासाठी ते नागपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राम रहिम सारख्या ढोंगी बाबांमुळे संस्कृतीचं नुकसान होतं. अशा व्यक्तींना कायद्याची भाषा समजावलीच पाहिजे, असंदेखील बाबा रामदेव म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या टीकेवर बाबा रामदेव यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांचं देशाकरता काही योगदान नाही, दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आखाडा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव नसल्याबाबत सवाल करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामदेव बाबांवर टीका केली होती.
ढोंगी बाबांच्या यादीत रामदेव बाबांचं नाव नाही हे पाहून दुख: झालं - दिग्विजय सिंह भोंदू बाबांच्या यादीत योगगुरु बाबा रामदेव यांचं नाव नसल्याचं पाहून आपल्याला दुख: झाल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. रविवारी अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर देशातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली. अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली. यादीत आसाराम बापू, संत रामपाल आणि गुरमीत राम रहीमच्या नावाचा समावेश आहे. दिग्विजय सिंह यांनी यासंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'यादीत बाबा रामदेव यांचं नाव नाही हे पाहून आपण हताश झालो आहोत'. यावेळी दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव बनावट वस्तू विकून फसवणूक करत असल्याचाही आरोप केला आहे. 'खोट्याला खरं सांगून बाबा रामदेव वस्तू विकत आहे', असं दिग्विजय सिंह बोलले आहेत.