पक्षासाठी काम करताना नेतृत्वपदाची गरज नाही, राहुल गांधी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 02:43 AM2020-08-20T02:43:07+5:302020-08-20T06:41:47+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही स्पष्ट केले की, पक्षासाठी लढा देण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी नेतृत्वपदाची गरज नाही.
नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी एका पुस्तकासाठी प्रियांका गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीवरुन कुजबूज सुरु असताना काँग्रेसने स्पष्ट केले की, नेहरू-गांधी परिवाराला कधीही सत्तेची लालसा नव्हती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही स्पष्ट केले की, पक्षासाठी लढा देण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी नेतृत्वपदाची गरज नाही.
‘इंडिया टुमारो : कन्व्हर्सेशन वुईथ द नेस्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’ या पुस्तकाला प्रियांका गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीतील काही भाग प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्याने जोरदार चर्चा होत असताना काँग्रेसनेही तेवढ्याच कणखरपणे नेहरू-गांधी परिवार आणि काँग्रेसची तात्त्विक भूमिका स्पष्ट केली आहे. प्रियांका गांधी यांनी वर्षभरापूर्वी १ जुलै २०१९ रोजी ही मुलाखत दिली होती. त्यानंतर बरेच काही बदलले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राहुल गांधी यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती; परंतु राहुल गांधी यांनी नम्रपणे हे पद नाकारले, असा खुलासा काँग्रेसने बुधवारी केला. वर्षभरापूर्वीची मुलाखत माध्यमांनी प्रकाशित करण्यामागचा डाव आम्ही ओळखून आहोत. तथापि, मोदी-शहा यांच्याकडून भारतीय राजकारणावर होत असलेला खोडसाळ हल्ला आणि त्याविरुद्ध निर्भयपणे लढा देणे, हाच खरा आजचा संदर्भ होय, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टष्ट्वीट केले आहे.