नवी दिल्ली : महाराष्ट्रात ‘आॅपरेशन लोट्स’ भाजप करणार नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. हे अंतर्विरोधी सरकार जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालेल, जेव्हा बदलेल तेव्हा बघू. सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे. त्याचा सामना करायला हवा. आघाडी सरकारने ज्या घोषणा केल्या त्या आधी पूर्ण करायला हव्यात, लोकांच्या समस्या सोडवा, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले.फडणवीस यांनी राज्यातील साखर उद्योगासंदर्भात मंत्रिगटाचे प्रमुख असलेल्या अमित शहा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. साखर कारखाने गेल्या दोन तीन वर्षांपासून अडचणीत आले आहेत. त्याच्या कर्जाचे वन टाईम रिस्ट्रक्चरिंग करावे, सॉफ्ट लोन द्यावे. इथेनॉल धोरणाचा विस्तार व्हावा, तेल कंपन्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याची धोरणात तरतूद करण्याची विनंती शिष्टमंडळाने शहा यांना केल्याचे त्यांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय कोरे, धनजंय महाडिक, जयकुमार गोरे, पृथ्वीराज देशमुख यावेळी उपस्थित होते.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांच्याशीही शिष्टमंडळाने चर्चा केली. राज्यातील शिक्षण क्षेत्राविषयी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांचीही फडणवीस यांनी रात्री उशिरा भेट घेतली.राजकीय चर्चांना पेव- राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य भाजप नेत्यांसह फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राजकीय चर्चांना त्यामुळे पेव फुटले आहे.- इतरही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेणाऱ्या फडणवीस यांनी हा दौरा राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण दिले.साखर उद्योग, कोरोना प्रसार रोखण्यासाठी उपाय योजना सुचवण्यासाठी हा दौरा असल्याचे फडणवीस म्हणाले.फडणवीस संसदीय मंडळात?- फडणवीस यांना पक्षीय पातळीवर संसदीय मंडळाचे सदस्य करण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झाली नाही.आधी कार्यकारिणी जाहीर होईल मगच संसदीय मंडळ तयार होईल. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा व ज्येष्ठ नेते संसदीय मंडळात कुणाला घ्यावे यावर निर्णय घेतील.
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ नाही, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 1:58 AM