'शेतकऱ्यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही, नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही'; कृषी मंत्र्यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 12:03 PM2021-12-01T12:03:00+5:302021-12-01T12:03:14+5:30
हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही विरोधकांच्या गोंधळातच सुरू झाला.
नवी दिल्ली:संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. दोन्ही सभागृहात तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवातही जोरदार गदारोळात झाली. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच लोकसभेचे कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेच्या 12 खासदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. हे निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. निलंबित खासदारांनी माफी मागावी, असं सभापतींनी बोलले असले तरी विरोधक त्यासाठी तयार नाहीत.
'मृत्यूची नोंद कृषी मंत्रालयाकडे नाही'
दरम्यान, कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या आंदोलनात शेतकऱ्यांचा मृत्यू आणि नुकसान भरपाईबाबत सरकारने मंगळवारी संसदेत प्रतिक्रिया दिली. सरकारकडे असा काही डेटा आहे का, ज्यामध्ये पीडित कुटुंबांचा उल्लेख असेल किंवा त्यांना मदत करण्याचा काही प्रस्ताव असेल ? असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता. यावर कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, कृषी मंत्रालयाकडे मृत्यूची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.
गांधी पुतळ्याजवळ विरोधकांची निदर्शने
आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी खासदारांच्या निलंबनाला विरोध केला. संसदेतील महात्मा गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी निदर्शने केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही राज्यसभेतील 12 विरोधी सदस्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी करत आहोत. आम्ही बैठक घेऊन पुढील कृती ठरवू.
टीएमसी खासदार सौगता रॉय म्हणाल्या - 12 निलंबित खासदारांना माफी मागण्यास सांगितले आहे, पण विरोधक माफी मागतील असे मला वाटत नाही. 12 खासदारांपैकी 2 खासदार तृणमूलचे आहेत, तृणमूल माफी मागण्याच्या विरोधात आहे. तृणमूलचे दोन्ही खासदार गांधी पुतळ्यासमोर धरणे धरत बसले असून हे धरणे सुरूच राहणार आहे.