कोलकाता - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात बलाढ्य झालेल्या भाजपाविरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जंग जंग पछाडत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेसविरोधात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे. सोमवारी कोलकाता येथे झालेल्या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांविरोधात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे.
तृणमुक काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेबाबत चर्चा केली. देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या चर्चेनंतर ही एक चांगली सुरुवात असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. " मला वाटते राजकारण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि आमच्यामध्ये जी चर्चा झाली तिचे केंद्र देशाचा विकास हे होते. राजकारण तुम्हाला अशा स्थितीमध्ये आणते, जिथे तुम्हाला विविध प्रकारच्या लोकांसोबत काम करावे लागते."असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तर स्वत:ला राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी तिसरी आघाडी ही सामुहिक नेतृत्व असल्याचे सांगितले."हे एक सामुहिक आणि संघीय नेतृत्व असेल, ज्यामध्ये सगळे जण एकत्र असतील. 2019 पूर्वी एक तिसरी आघाडीही तयार होईल, असे लोकांना वाटत आहे. मी स्पष्टपणे सांगतो की ही तिसरी आघाडी देशातील जनतेसाठी असेल," असे चंद्रशेखर राव म्हणाले.