गरीब कुटुंबात जन्मणारेही स्वप्न पाहू शकतात - मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:19 AM2018-03-26T00:19:15+5:302018-03-26T00:19:15+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक लोकांनी थट्टा केली आणि एका मागास कुटुंबातील मुलाने प्रगती करु नये यासाठी प्रयत्न केले, असे सांंगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, आजचा भारत हा पूर्ण वेगळा आणि गरीब व मागासवर्गीयांचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी हे दाखवून दिले की, यशस्वी होण्यासाठी संपन्न कुटुंबातच जन्म घेणे आवश्यक नाही. तर, भारतात गरीब कुटुंबात जन्म घेणारेही स्वप्न पाहू शकतात आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत ठेऊ शकतात.
‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया, चरण सिंह आणि देवीलाल यासारख्या नेत्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. या नेत्यांनी राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषि आणि शेतकऱ्यांचे महत्व ओळखले होते, असेही ते म्हणाले.
मोदी म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल ते ५ मे या काळात ‘ग्राम स्वराज अभियान’आयोजित करण्यात येणार आहे. याअंतर्गत पूर्ण भारतात ग्राम विकास, गरीबांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्याय याबाबत कार्यक्रम होतील.