पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. य़ासोबतच त्यांनी राहुल गांधींवर देखील निशाणा साधला आहे. "ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांची गॅरेंटी नाही, ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करताहेत" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "10 वर्षांत काँग्रेसने देशाला 11व्या क्रमांकावर आणलं आहे. आम्ही 10 वर्षांत पाचव्या क्रमांकावर आणलं. ही काँग्रेस आपल्याला आर्थिक धोरणांवर भाषण देत आहे."
"ज्यांनी सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना कधीही आरक्षण दिलं नाही. ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ज्यांनी देशातील रस्त्यांना आणि चौकाचौकांना आपल्याच कुटुंबाची नावं दिली, तेच आपल्याला सामाजिक न्यायावर भाषण देत आहे. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्याची गॅरेंटी नाही, आपल्या धोरणाची गॅरेंटी नाही. ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्न उपस्थित करत आहेत" असं म्हणत पंतप्रधान मोदींनी निशाणा साधला आहे.
"जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिलं आहे. यावेळी मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं.
"मी केवळ प्रार्थना करू शकतो. पश्चिम बंगालमधून आव्हान देण्यात आले आहे की, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस 40 जागाही जिंकू शकणार नाही. मात्र, मी प्रार्थना करतो की काँग्रेसने आपल्या 40 जागा तरी वाचवाव्यात" असा उपरोधिक टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला.
"ज्या गोष्टी देशात घडत आहेत, ते जनतेला समजले पाहिजे. काँग्रेस पक्ष विचारांनीही कालबाह्य झालेला आहे. त्यामुळे कामकाजही आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. इतकी दशके देशावर राज्य करणारा पक्ष, एवढा मोठा पक्ष, याचे अशा प्रकारे पतन झाले आहे. याचा आम्हाला कदापि आनंद नाही. काँग्रेस पक्षासोबत आमच्या संवेदना आहेत" अशी खरमरीत टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.