वाराणसीतील संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 11:33 AM2018-12-05T11:33:38+5:302018-12-05T11:46:30+5:30
वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे ही धमकी देण्यात आल्याने वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे.
वाराणसी - वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे ही धमकी देण्यात आल्याने वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये करण्यात आलेल्या स्फोटापेक्षा मोठा स्फोट घडवून आणू अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
संकटमोचन मंदिराचे महंत विश्वंभरनाथ मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री त्यांना धमकीची चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये संकटमोचन मंदिरात 2006 पेक्षाही मोठा स्फोट घडवून आणू, आमच्या या धमकीकडे दुर्लक्ष करू नका असा संदेश देण्यात आल्याचं महंत मिश्र यांनी सांगितलं.
धमकीची चिठ्ठी आल्यानंतर मंगळवारी रात्री (4 डिसेंबर) मिश्र यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. या चिठ्ठीत जमादार मियाँ आणि अशोक यादव ही दोन नावे आहेत. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. याआधी 7 मार्च 2006 रोजी संकटमोचन मंदिर, कँट स्टेशन आणि दशाश्वमेध घाट या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. या स्फोटात संकटमोचन मंदिरात 7 आणि कँट स्टेशनमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच स्फोटात 100 हून अधिक लोक जखमी झाले होते.