नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील काही शहरांची नावं बदलण्याचा सपाटा सरकारनं लावला आहे. यात योगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेश सरकार आघाडीवर होतं. यानंतर आता मोदी सरकारनं अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहातील काही लोकप्रिय बेटांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या समूहातील रॉस बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव दिलं जाणार आहे. तर नील आणि हॅवलॉक बेटाचं अनुक्रमे शहीद आणि स्वराज असं नामांतर करण्यात येईल.भाजपा नेते एल. ए. गणेशन यांनी मार्च 2017 मध्ये राज्यसभेत लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या हॅवलॉक बेटाचं नामांतर करण्याची मागणी केली होती. या बेटाचं नाव ब्रिटिश जनरल सर हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं. भारतात ब्रिटिशांची सत्ता असताना हॅवलॉक यांनी देशात सेवा दिली होती. हॅवलॉक हे केंद्रशासित प्रदेशातील सर्वात मोठं बेट आहे. रविवारी (30 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमान निकोबारला जाणार आहेत. 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरला तिरंगा फडकावला होता. त्या घटनेला रविवारी 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ मोदी रविवारी अंदमानात तिरंगा फडकावतील. यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह त्यांच्यासोबत असतील. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपाननं या बेटांवर कब्जा केला होता. त्यावेळी त्यांनी अंदमान-निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज नावं देण्याची शिफारस केली होती.
अंदमान-निकोबार समूहातील बेटाला देण्यात येणार सुभाषचंद्र बोस यांचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 5:13 PM