जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पुंछ जिल्ह्यातील गुलपूर आणि खारी करमाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता गुलपूर सेक्टरमध्ये गोळीबार सुरू करण्यात आला. यात नियंत्रण रेषेवरील भारतीय लष्काराच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच, खरी करमाडा भागातही भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला गेला. यावेळी खरी करमाडा गावातील महमद रफीक यांच्या घरावर गोळीबार झाला. यामुळे महमद रफीक, त्यांची पत्नी राफिया आणि १५ वर्षाचा मुलगा इरफान यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून सतत गोळीबार करण्यात येत आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेवरील सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे. तसेच, सीमेला लागून असलेल्या भागांमधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.