तीन अतिरेकी जेरबंद , काश्मीरमध्ये शस्त्रे व स्फोटके जप्त; लष्कराने केले दहशतवाद्यांचे मोड्यूल उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:13 AM2017-10-17T01:13:27+5:302017-10-17T01:14:15+5:30
सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून तीन अतिरेक्यांना अटक करून एका अतिरेकी गटाचा पर्दाफाश केला आहे. मागच्या तीन दिवसांत दक्षिण काश्मीरमधून लष्कर-ए-तैयबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली
श्रीनगर : सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून तीन अतिरेक्यांना अटक करून एका अतिरेकी गटाचा पर्दाफाश केला आहे. मागच्या तीन दिवसांत दक्षिण काश्मीरमधून लष्कर-ए-तैयबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली, असे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले.
दोन दहशतवाद्यांनी १४ आॅक्टोबर रोजी काझीगुंड भागातील कुंड येथे एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या खाजगी सुरक्षारक्षकांकडील शस्त्रे हिसकावण्यासाठी गोळीबार केला; परंतु स्थानिक लोकांनी एकच आरडाओरड केल्याने त्यांना पळ काढावा लागला. ही माहिती मिळताच पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने नाकेबंदी करून मोटारसायकलस्वार दोन अतिरेक्यांना जेरबंद केले.
खुर्शीद अहमद डार आणि हाजिक राथेर अशी या दोघांची नावे आहेत. एक पिस्तूल, काही स्फोटके आणि काही जिवंत काडतुसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. या दोघांचा लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहे. एका वैद्यकीय संस्थेत काम करणारा अतिरेकी रमीज याटू यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. शनिवारी दमहाल हांजीपुरा येथे त्याने पोलीस वाहनावरील हल्ल्यासाठी अतिरेक्यांना मदत केली होती. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला होता. हिज्बुुल मुजाहिदीन या संघटनेने हा हल्ला केला होता, असे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. शुक्रवारीही पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका अतिरेक्याला अटक केली होती. मागच्या महिन्यात मंत्री नईम अख्तर यांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता.
स्वत:हून शरण यावे
स्थानिक अतिरेक्यांनी स्वत:हून शरणागती पत्करून शस्त्रांचा त्याग करावा. त्यांनी तसे केल्यास पुनर्वसन करण्याची व त्यांना संरक्षण देण्याचीआवश्यक ती मदत करण्याची आमची तयारी आहे, असेही पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले.